शिरूर, ता. २८ : शहरातील भररस्त्यावर झालेल्या प्रसूती प्रकरणात पीडित महिलेच्या जबाबावर तिची स्वाक्षरी किंवा अंगठा नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांनी नेमलेल्या चौकशी समितीचा दावा संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून प्रकरणातील गुंता वाढला आहे.
सुप्रिया नीतेश काळे (वय २३, रा. जोशीवाडी) यांनी प्रसूतीकळा असह्य झाल्याने रस्त्यावर बाळाला जन्म दिला होता. रुग्णालयाने दाखल करून घेतले नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले यांनी नेमलेल्या चौकशी समितीमार्फत सोमवारी (ता. २७) या प्रकरणी चौकशी करण्यात आली. प्रसूती नोंदवही व सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. त्यानंतर पीडित महिला प्रसूतीसाठी शिरूरच्या ग्रामीण रुग्णालयात आलीच नव्हती, असा दावा चौकशी समितीसह शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन धस व वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार पाटील यांनी केल्याने व तसा जबाब सुप्रिया काळे यांनी दिल्याचे सांगितल्याने या प्रकरणातील गंभीरता काहीशी धूसर झाली होती. तथापि, सुप्रिया यांनी जबाब दिल्यानंतर लेखी जबाबाच्या कागदावर सही किंवा अंगठा दिलेला नसल्याची बाब पुढे आल्याने गूढ वाढले आहे.
दरम्यान, नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांनी नगरसेवक व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह सोमवारी (ता. २८) ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. स्त्रीरोग वैद्यकीय अधिकारी नेमण्याच्या मागणीचे निवेदनही डॉ. धस व डॉ. पाटील यांना देण्यात आले. नगर परिषदेकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. तथापि, एकही रूग्ण व विशेषतः महिला, गर्भवती माता उपचाराविना माघारी गेल्या नाही पाहिजेत, अशी सूचना त्यांनी केली.
सोनोग्राफीची सुविधा नसल्याने माघारी
प्रसूतिपूर्व तपासणीसाठी तीन दिवसांपूर्वी मी ग्रामीण रुग्णालयात गेले असता सोनोग्राफी करावी लागेल असे सांगण्यात आल्याने व तेथे सोनोग्राफीची सुविधा नसल्याने मी माघारी गेले. शनिवारी प्रसूतीसाठी रुग्णालयात येत असताना प्रसूतीकळा असह्य झाल्याने वाटेतच बाळाला जन्म द्यावा लागला, असे सुप्रिया काळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.