शिरूर, ता. २२ : शिरूर शहर व परिसरातील मॅफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाच्या विक्रीची पाळेमुळे शिरूर तालुक्यासह श्रीगोंदे व पारनेर तालुक्यात खोलवर रुजली असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. अहिल्यानगर पोलिस दलातील पोलिसच थेट एमडी तस्कर निघाल्याने सामान्यांसह पोलिस दलदेखील हादरले आहे. खरेदी- विक्रीत अडकलेले रॅकेट उघड करण्याबरोबरच या अमली पदार्थाच्या नशेत गुरफटलेल्या तरुणाईला या खाईतून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.
शिरूरच्या बाह्यवळणावर स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून दोन कोटी रुपयांचे एमडी जप्त झाल्यावर पोलिसांनी पाळेमुळे खणून काढताना अहिल्यानगर जिल्ह्यातील कुरुंद व कोहकडी (ता. पारनेर) तसेच, हिंगणी व हमालवाडी (ता. श्रीगोंदे) येथील काही तरुणांना ताब्यात घेतले. कुरुंद येथील एका घरावर छापा टाकत सुमारे २० कोटी रुपयांचे एमडी जप्त केल्यानंतर त्याचे धागेदोरे थेट अहिल्यानगर पोलिस दलापर्यंत जाऊन धडकले. तेथील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या श्यामसुंदर विश्वनाथ गुजर (वय ३९, रा. नेप्ती, ता. जि. अहिल्यानगर) या पोलिसाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून धक्कादायक माहिती उजेडात आली. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला गुजर नार्को टेस्टसाठी काम करायचा. अहिल्यानगर व परिसरात केलेल्या कारवाईत जप्त केलेले एमडी ड्रग्ज व इतर अमली पदार्थांचा मुद्देमाल अहिल्यानगरच्या जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील स्वतंत्र कक्षात ठेवला जायचा. या कक्षाचा ताबा व चाव्यादेखील गुजर याच्याकडेच असल्याने तो मुद्देमालातून अमली पदार्थ काढून बाहेर विकत असल्याचे धक्कादायक वास्तव पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. या आतबट्ट्याच्या उद्योगासाठी तो काही तरुणांसह एका बडतर्फ पोलिसाची देखील मदत घेत असल्याचे चौकशीतून पुढे आले आहे.
श्यामसुंदर गुजर याच्यासह शादाब रियाज शेख (रा. शिरूर), ज्ञानेश्वर बाळू शिंदे (रा. हमालवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर), ऋषिकेश प्रकाश चित्तर (रा. कुरुंद, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) व महेश दादाभाऊ गायकवाड (रा. हिंगणी, ता. श्रीगोंदे, जि. अहिल्यानगर) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूर पोलिसांच्या मदतीने अटक केली असून, शिरूर न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत (ता. २७) पोलिस कोठडी दिली आहे. शिरूर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक गोविंद खटींग पुढील तपास करीत आहेत.
धक्कादायक माहिती उघड
शिरूरमधील शादाब शेख याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून एक किलो ५१ ग्रॅम म्हणजेच दोन कोटी दहा लाख रुपयांचे एमडी जप्त केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित हे रॅकेट उघडकीस आणण्याकामी पारनेर तालुक्यातील कुरुंद येथील ज्ञानेश्वर शिंदे याच्या घरावर छापा टाकला असता तेथून तब्बल नऊ किलो ६५५ ग्रॅम वजनाचे म्हणजेच तब्बल १९ कोटी ३१ लाख रुपये किमतीचे एमडी जप्त केले. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस गुजर याच्या ताब्यात तेथील कारवाईत जप्त केलेले १०० किलोहून अधिक एमडी तेथील कक्षात होते. या कक्षाच्या चाव्याच गुजरकडे असल्याने तो त्यातील मुद्देमाल बाहेर काढून विकताना ही चोरी कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून तेवढ्याच वजनाचा मैदा मुद्देमालात बेमालूमपणे मिसळत असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे.
आणखी नावे उघड होण्याची शक्यता
वादग्रस्त कारकीर्द असलेला गुजर यापूर्वी पारनेर पोलिस ठाण्यातही कार्यरत होता. तेथूनच त्याचे या परिसरातील गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांशी लागेबांधे निर्माण झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अमली पदार्थांच्या तस्करीत असलेल्या गुन्हेगारांशीही त्याचे त्यावेळेपासूनच संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या अटकेनंतर नगर व पुणे पोलिस दलात अस्वस्थतेबरोबरच भीतीदायक स्थिती निर्माण झाली असून, अधिक चौकशीतून आणखी काही पोलिस कर्मचारी, दलाल व राजकीय आश्रयदात्यांबरोबर एमडीची खुलेआम विक्री करणारांची नावे उघड होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
06029
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.