कळस, ता. ३० : रुई (ता. इंदापूर) येथील श्री बाबीर देवाच्या यात्रेवर यंदा दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. यात्रेदरम्यान भाविकांना पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
भाविकांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये, यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी मंदिर परिसरात आज प्रशासकीय बैठक झाली. यंदाच्या यात्रेला अंदाजे तीन ते चार लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता गृहीत धरून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अजितसिंह पाटील यांनी सोनाई उद्योग समूह, नेचर डेअरी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मोटार वाहतूक संघ यांच्याकडे टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केल्याची माहिती दिली. बैठकीत तहसीलदार जीवन बनसोडे यांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने पोलिसांनी रस्ते मोकळे व प्रशस्त ठेवावेत, अनधिकृत पार्किंगला आळा घालावा तसेच रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचना दिल्या.
गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष पथके
यात्रेदरम्यान आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाची पथके आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच यात्रेत प्रतिबंधित पदार्थांची विक्री, अवैध मद्यविक्री आणि किरकोळ चोऱ्यांसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष पथके तैनात करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
यात्रेत विक्री होणारे खाद्यपदार्थ स्वच्छ, दर्जेदार आणि भेसळविरहित असावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला आवश्यक सूचना देण्याचेही ठरविण्यात आले. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत, वीज वितरण कंपनी आणि अन्य संबंधित विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडून यात्रेकरूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यावर बैठकीत चर्चा झाली. यावेळी गटविकास अधिकारी सचिन खुडे, मंडल अधिकारी रूपाली शेळके, पोलिस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रजत काटवटे आदी उपस्थित होते.
वाहतूक कोंडी आणि पाणी टंचाई नित्याचीच
यात्रेपूर्वी प्रशासनाने आयोजित केलेल्या बैठकीत वाहतूक कोंडी व पाणी प्रश्नावरती चर्चा होते. यावर उपाययोजना राबविण्याचे ठरविण्यात येते. प्रत्यक्षात मात्र वाहतूक कोंडी व पाणी टंचाईचा सामना भाविकांना दरवर्षी करावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.
यात्रेची रूपरेषा
२ नोव्हेंबर - श्री बाबीर मंदिरात घटस्थापना
१० नोव्हेंबर- देवाचा घट हलवण्याचा कार्यक्रम आणि यात्रेस सुरुवात
११ नोव्हेंबर- यात्रेचा मुख्य दिवस
१२ नोव्हेंबर- देवाच्या नवसाची परतफेड व भाकणुकीच्या कार्यक्रमाने यात्रेची सांगता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.