‘श्रीं’च्या दर्शनासाठी गोंदवल्यात गर्दी
सकाळपासूनच भाविकांच्या रांगा; सलग सुट्यांचा योग
गोंदवले, ता. १ : सलग आलेल्या सुट्या, गुरुवार आणि नववर्षाचा मंगलमय प्रारंभ असा त्रिवेणी योग जुळून आल्याने श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या समाधी दर्शनासाठी आज गोंदवलेनगरीत भाविकांचा अक्षरशः महापूर उसळला. पहाटेपासूनच राज्य-परराज्यातून आलेल्या हजारो भाविकांनी सद्गुरूंच्या समाधीचे दर्शन घेतले. या अभूतपूर्व गर्दीमुळे संपूर्ण गोंदवले परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
नाताळनिमित्त सलग आलेल्या सुट्यांना लागूनच ‘श्रीं’च्या आराधनेसाठी भाविकांची श्रद्धा असलेला गुरुवार आणि नववर्षाची सुरुवात असा योग आज जुळून आल्याने भाविकांनी समाधी दर्शनासाठी गोंदवल्यात गर्दी झाली होती. नववर्षाची सुरुवात गुरुवर्यांच्या चरणी व्हावी, जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात, कुटुंबीयांच्या आरोग्य व समृद्धीसाठी आशीर्वाद मिळावा या श्रद्धेने भाविकांनी समाधी मंदिरात उपस्थिती लावली होती. अनेक जण कालपासूनच गोंदवल्यात दाखल झाले होते. त्यामुळे पहाटे काकड आरतीसाठीही मोठी गर्दी झाली होती. पहाटे समाधी मंदिरात विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर दिवसभर ‘श्रीराम जय राम, जय जय राम’ या नामघोषात भाविकांनी समाधीचे दर्शन घेतले.
समाधी परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. दीपमाळा, रांगोळ्या आणि फुलांच्या सजावटीमुळे मंदिर परिसर अधिकच शोभून दिसत होता. नववर्षाचे औचित्य साधून अनेक भाविकांनी अभिषेकही केला. काही भाविकांनी पायी दिंडीने येत आपली श्रद्धा व्यक्त केली. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर समितीने चोख व्यवस्था उभारली होती.
दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सद्गुरूंच्या समाधीचे दर्शन झाल्याने विशेष आनंद व्यक्त केला.
दरम्यान, सलग सुट्यांचा कालावधी, तसेच येत्या शनिवारी पौर्णिमा असल्याने आणखी काही दिवस भाविकांची मोठी वर्दळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाकडूनही आवश्यक ती खबरदारी व नियोजन करण्यात आले आहे.
------------------------------
चौकट
रस्त्यावर वाहतूक कोंडी
‘श्रीं’च्या समाधी मंदिर सातारा- लातूर महामार्गालगत असल्याने भाविकांबरोबरच रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सध्या उसाची वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने या वाहतुकीत वाढ होऊन अनेकदा वाहनकोंडीचे प्रकारही घडत होते. येथील मुख्य चौकात आज वाहतूक पोलिसांच्या गैरहजेरीमुळे वारंवार वाहनांची कोंडी होऊन वाहतूक ठप्प होत होती.
--------------------------------
कोट
गोंदवले येथे येऊन मनाला खूप शांती आणि समाधान मिळते. आज नववर्षाची सुरुवातच समाधी दर्शन घेता आल्याने गुरुकृपेने झाल्याने खप आनंद होतोय.
- श्री भक्त, गोंदवले.
---------------------------------
02540
गोंदवले बुद्रुक : सलगच्या सुट्या व नववर्षारंभामुळे गुरुवारी समाधी दर्शनासाठी झालेली भाविकांची गर्दी. (फिरोज तांबोळी : सकाळ छायाचित्रसेवा)
-------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.