शिरूर, ता. १ : शिरूर शहराबाहेरून जाणाऱ्या पुणे- नगर रस्त्यावरील वाढते अपघात, सुरक्षा उपाययोजनांची वाणवा आणि अपघातात हकनाक बळी जात असल्याच्या मुद्द्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १२ दिवस ठिय्या मारूनही दखल न घेतली गेल्याने जयहिंद सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश वाळूंज व सहकारी आंदोलकांनी अखेर तहसीलदार कार्यालयाला टाळे ठोकले होते. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी वाळूंज यांच्यासह आंदोलकांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा मंगळवारी (ता. १) दाखल केला.
नीलेश वाळूंज, प्रीतेश फुलडाळे, निळं वादळ सामाजिक प्रतिष्ठानच्या अध्यक्ष दिपिका भालेराव यांच्यासह तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. वाळूंज यांनी १८ ऑगस्टपासून तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या दिला होता. त्यांच्या या निषेध आंदोलनात विविध संस्था- संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र, दखल घेतली न गेल्याने २७ ऑगस्टला वाळूंज व त्यांच्या सहकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयातील तहसीलदारांच्या कक्षाला टाळे ठोकण्याचे प्रतिकात्मक आंदोलन केले. पाच मिनिटांच्या आतच हे टाळे काढून घेण्यात आले. मात्र, प्रशासनाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत तिघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला. निवासी नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक नितीन केनेकर पुढील तपास करीत आहेत.