(टीप- सकाळ मनी जून २६)
----------------------
(हा लेख ३ पानांत बसवावा. लेखातील फोटोंसाठी लेखकाची मूळ पाहावी.)
-----------------------
सेक्शन
सक्सेस स्टोरी
-----------
धवलक्रांतीत खारीचा वाटा
---------------------
प्रसाद घारे
prasad.ghare@gmail.com
------------------------------
लीड
----
सुमारे सहा दशकांपूर्वी एका म्हशीपासून सुरू झालेला दुग्ध व्यवसाय आज हजारो पुणेकरांच्या विश्वासाचा ब्रॅंड बनला आहे. सचोटी, गुणवत्तेचा आग्रह आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड यामुळे पायगुडे कुटुंबियांची ‘श्रीराम डेअरी’ पुण्यातील दुग्ध व्यवसायात वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. भारताच्या धवलक्रांतीत छोट्या डेअऱ्यांचे योगदान किती महत्त्वाचे आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘श्रीराम डेअरी.’ एका छोट्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे, त्याची ही प्रेरणादायी यशोगाथा...
---------------------------------------------------------------
भारताची वाटचाल आर्थिक महासत्तेकडे सुरू आहे की नाही, याबाबत तज्ज्ञांमध्ये मतभेद असू शकतात; मात्र १९९८ पासून म्हणजे गेली तब्बल २८ वर्षे दूध उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे, याबाबत कोणाचेही दुमत नाही. आज जगाच्या पाठीवर भारत हा दूध उत्पादनात पहिल्या क्रमांकावर असून, जागतिक दूध उत्पादनात भारताचा वाटा जवळपास २२ ते २५ टक्के इतका आहे. भारतानंतर अमेरिका, चीन, पाकिस्तान आणि ब्राझील या देशांचा क्रमांक लागतो. ही आकडेवारी सांगण्याचे कारण म्हणजे आपण पुण्यातील अशा एका डेअरीची यशोगाथा जाणून घेणार आहोत, जिने खऱ्या अर्थाने शून्यातून आपला व्यवसाय उभा केला. पुण्यातील प्रसिद्ध पैलवान काशिनाथ पायगुडे यांनी १९६७-६८ च्या सुमारास या व्यवसायास लहान प्रमाणात सुरुवात केली. आज ऐंशीच्या उंबरठ्यावर असलेले त्यांचे पुत्र विनायक पायगुडे (भाऊ) यांनी अथक परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर या व्यवसायाला आकार दिला. गेल्या १५-२० वर्षांत विनायक पायगुडे यांचे पुत्र श्रीधर आणि श्रीराम यांनी या डेअरीचा मोठ्या प्रमाणात विस्तार करून तिला नावलौकिक मिळवून दिला. आगामी काळात पायगुडे कुटुंबीयांची चौथी पिढी या व्यवसायात पदार्पण करणार आहे. जवळपास साठ वर्षे चोखंदळ पुणेकरांचा विश्वास संपादन केलेल्या या डेअरीचे नाव आहे ‘श्रीराम डेअरी.’
प्रेरणादायी प्रवास
-------------
पुण्यातील ‘श्रीराम डेअरी’ हा ब्रँड निर्माण करणाऱ्या पायगुडे परिवाराची कथा खरोखर प्रेरणादायी आहे. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची कर्मभूमी असलेल्या पुण्यातील कर्वेनगर परिसरात साठ वर्षांहून अधिक काळ हा परिवार शेकडो पुणेकरांना पहाटे पाच वाजल्यापासून ताजे दूध घरपोच देत आहे. आज केवळ दूधच नव्हे, तर दही, ताक, लस्सी, पनीर, खरवस, खवा, तूप, लोणी, चक्का, श्रीखंड, आम्रखंड अशा अनेक दर्जेदार दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन कर्वेनगर येथील प्रकल्पात केले जाते. विशेष म्हणजे या क्षेत्रातील तीव्र स्पर्धेतही हजारो पुणेकरांनी ‘श्रीराम डेअरी’ या ब्रँडवर विश्वासाची मोहोर उमटवली आहे.
‘श्रीराम डेअरी’ची उत्पादने ‘श्री अन्नपूर्णा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स’ या कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवली जातात. वारजे, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, सनसिटी, मधुकोष सोसायटी, रामबाग कॉलनी, शिवणे, डहाणूकर कॉलनी, एरंडवणे, भुसारी कॉलनी, भुगाव, सहकारनगर आणि बाणेर परिसरातील पंधरा दुकानांमधून ही उत्पादने उपलब्ध आहेत.
दररोज सुमारे साडेपाच हजार लिटर गायी व म्हशींच्या दुधाची विक्री, तसेच हजार लिटरपेक्षा अधिक दुग्धजन्य पदार्थांची विक्री ‘श्रीराम डेअरी’तून केली जाते. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर अधिकाधिक भाव देण्यात ‘श्रीराम डेअरी’ पुण्यात आघाडीवर आहे. ‘शेतकरी समृद्ध झाला, तरच व्यवसाय बहरणार,’ याची जाणीव पायगुडे कुटुंबाला आहे.
कुडजे ते कर्वेनगरची वाटचाल
--------------------
खडकवासला धरणाजवळील कुडजे या छोट्याशा गावातील काशिनाथ बाबुराव पायगुडे आणि हिराबाई काशिनाथ पायगुडे या दाम्पत्याने सुमारे साठ वर्षांपूर्वी कर्वेनगर परिसरात लहान प्रमाणात दुग्ध व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला डेअरीचे नाव ‘विनायक दुग्धालय’ असे होते. १९८८-८९ मध्ये त्याचे नामकरण ‘श्रीराम डेअरी’ असे करण्यात आले. पायगुडे कुटुंब रामभक्त असल्याने रामाचे नाव घेऊन व्यवसाय सुरू केला तर यश मिळते, अशी त्यांची श्रद्धा होती. काशिनाथ पायगुडे हे नामांकित पैलवान होते. १९४८ ते १९५१ या काळात त्यांनी पुणे परिसरातील अनेक नामांकित पैलवानांना चितपट केले होते. साताऱ्याचे प्रसिद्ध पैलवान लक्ष्मण जांभळे यांच्यासोबतची कुस्ती बरोबरीत सुटल्यानंतर त्यांनी कुस्ती क्षेत्रातून निवृत्ती घेतली. त्याच काळात मामांनी दिलेल्या एका म्हशीपासून दुग्ध व्यवसायाची सुरुवात झाली. स्वतः तब्येत कमावण्यासाठी दूध पिणे आणि उरलेले दूध घरपोच विकणे, अशा प्रकारे हा व्यवसाय सुरू झाला. दुधात पाणी न मिसळणे, ग्राहकांना उत्तम दर्जाचे दूध देणे आणि सचोटीने व्यवसाय करणे ही त्यांची मूलभूत तत्त्वे होती. सदाशिव पेठेतील सावंत इनामदार वाड्यातील एका छोट्याशा खोलीत संसार आणि व्यवसाय सुरू झाला. एकाच्या दोन, दोनाच्या चार म्हशी झाल्या. व्यवसाय वाढत गेला तसे गोठे स्थलांतरित करावे लागले.
पहाटे तीन वाजता उठून म्हशींच्या धारा काढणे, गार पाण्याने अंघोळ करून देवपूजा करणे आणि पहाटे साडेचार-पाच वाजता सायकलला दुधाच्या घागरी बांधून घराघरांत दूध पोहोचवणे, असा त्यांचा दिनक्रम होता. दूध वाटप करून परतताना जनावरांसाठी चारा, पेंड आणि सरकी आणली जायची.
आधुनिकतेकडे वाटचाल
--------------------
व्यवसाय वाढू लागला तशी १९६७-६८ च्या सुमारास कर्वेनगर परिसरात त्यांनी स्वतःची जागा घेतली. गोठ्यासाठी आणखी जागा विकत घेण्यात आली. याच काळात काशिनाथ पायगुडे यांचे पुत्र विनायक पायगुडे (भाऊ) यांनी लहान वयातच व्यवसायात पदार्पण केले. शिक्षण आणि व्यवसाय एकत्र सांभाळत त्यांनी बी.ए. पदवी पूर्ण केली. सचोटी, प्रामाणिकपणा आणि दुधाचा दर्जा यामुळे ग्राहकसंख्या झपाट्याने वाढू लागली. कर्वेनगर, कोथरूड, वारजे परिसर विस्तारू लागल्याने व्यवसायालाही वेग आला. पारंपरिक पद्धतीने दूध गरम करून थंड करण्याची पाश्चरायझेशन प्रक्रिया सुरुवातीला वापरली जात होती. कर्वेनगर परिसर १९८४ च्या सुमारास पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आल्यानंतर गोठे हलवण्याच्या नोटिसा येऊ लागल्या. अखेर गोठा बंद करावा लागला. बाहेरील डेअऱ्यांकडून दूध विक्रीचा प्रयोग फायदेशीर ठरला नाही. त्यानंतर शेतकऱ्यांकडून थेट दूध संकलन सुरू करण्यात आले. पाश्चराइज्ड दुधाची आधुनिक संकल्पना १९८५-८६ च्या काळात बाजारात आली. नवी यंत्रसामग्री आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी आणि आर्थिक फटके बसले; मात्र या क्षेत्रातील तज्ज्ञ किरण शाळिग्राम यांनी मदतीचा हात दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली छोटे पाश्चरायझेशन मशिन घेण्यात आले आणि व्यवसाय आधुनिकतेकडे वळू लागला.
तिसऱ्या पिढीचा विस्तार
-------------------
याच काळात विनायक पायगुडे यांचे मोठे पुत्र श्रीधर पायगुडे यांनी डेअरी क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १९९४ ते १९९६ या काळात मुंबई येथे ‘इंडियन डेअरी डिप्लोमा इन डेअरी टेक्नॉलॉजी’ हा सुवर्णपदक मिळवत पूर्ण केला. पुढील शिक्षणासाठी गुजरातला जाण्याऐवजी त्यांनी प्रत्यक्ष व्यवसाय विस्तारावर लक्ष केंद्रित केले. आधुनिक डेअरी व्यवस्थापनाचा अभ्यास झाल्यामुळे व्यवसायात नवे तंत्रज्ञान आणले गेले. कर्वेनगर येथे १९९७ मध्ये ‘श्रीराम डेअरी’चे पहिले रिटेल दुकान सुरू झाले. त्यानंतर लोणी, तूप, ताक, चक्का, श्रीखंड, आम्रखंड, कलाकंद, पेढे, गुलाबजाम, पनीर, लस्सी, बासुंदी, अंजीर रबडी, सिताफळ रबडी आणि हंगामी खवा मोदक अशा विविध उत्पादनांची निर्मिती सुरू झाली. विनायक पायगुडे यांचे धाकटे पुत्र श्रीराम पायगुडे यांनीही पदवी घेतल्यानंतर पूर्णवेळ व्यवसायात प्रवेश केला. शिक्षित आणि आधुनिक दृष्टिकोन असलेल्या दोन्ही मुलांच्या सहभागामुळे व्यवसायाचा विस्तार झपाट्याने झाला. सुटे दूध वितरणात होणारी भेसळ लक्षात आल्यानंतर प्लॅस्टिक पिशव्यांमधून दूध विक्री सुरू करण्यात आली. सुरुवातीला काही ग्राहकांनी विरोध केला; मात्र गुणवत्तेची खात्री पटल्यावर त्यांनीही ही पद्धत स्वीकारली.
रिटेल आणि फ्रँचायझी नेटवर्क
------------------------
कर्वेनगर येथे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने दूध संकलन, पाश्चरायझेशन, पॅकेजिंग आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती सुरू झाली. सुमारे १५-२० कर्मचारी, दूध वितरण करणारी मुले आणि पायगुडे कुटुंबीयांची मेहनती टीम यामुळे ‘श्रीराम डेअरी’चा व्यवसाय वेगाने वाढू लागला. कर्वेनगरसह शिवणे, वारजे, रामबाग कॉलनी, नवशा मारुती, सिंहगड रस्ता, सनसिटी, भुगाव, डहाणूकर कॉलनी आणि मंत्री पार्क परिसरात रिटेल दुकाने सुरू झाली. काही नामांकित आईस्क्रीम आणि मिठाई उत्पादकांनाही दूध व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा सुरू झाला. ठाणे आणि अमरावतीपर्यंतही काही उत्पादने पोहोचू लागली. डिलर्स-डिस्ट्रिब्युशनच्या माध्यमातून व्यवसाय विस्ताराचा प्रयत्न करण्यात आला; मात्र उधारीच्या समस्येमुळे तो बंद करून रिटेल आणि फ्रँचायझी नेटवर्कला प्राधान्य देण्यात आले. त्याचा व्यवसायाला मोठा फायदा झाला.
आज ‘श्रीराम डेअरी’ हे नाव ‘ट्रेड मार्क’ म्हणून नोंदणीकृत आहे. बँक व्यवहारांना प्राधान्य, दर्जेदार उत्पादनांबाबत तडजोड नाही, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षित कर्मचारी, स्वतःची प्रयोगशाळा आणि व्यवसायावर कुटुंबाचे बारकाईने लक्ष, या सर्व गोष्टींमुळे काही लिटर दुधापासून सुरू झालेला व्यवसाय आज हजारो लिटर विक्रीपर्यंत पोहोचला आहे.
काशिनाथ आणि हिराबाई पायगुडे यांनी लावलेल्या या रोपट्याला विनायक आणि विजया पायगुडे यांनी खतपाणी घालून मजबूत केले. श्रीधर, अनुराधा, श्रीराम आणि सुमती पायगुडे या तिसऱ्या पिढीने त्याला आधुनिकतेचा साज चढवला. त्यामुळेच ‘श्रीराम डेअरी’च्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे.
अगरबत्ती जळत राहते म्हणून घरात सुगंध दरवळतो; त्याचप्रमाणे पायगुडे परिवाराच्या तीन पिढ्या अहोरात्र झटल्या म्हणूनच हजारो ग्राहकांना ‘श्रीराम डेअरी’च्या दुधाची आणि विविध दुग्धजन्य पदार्थांची गोडी आज अनुभवता येत आहे. ‘श्रीराम डेअरी’च्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
(लेखक पुणेस्थित मुक्त पत्रकार आहेत. मोबाईल ९३७३००५४४८)
----------------
(चौकट १)
----
धवलक्रांतीतील योगदान
-------------------
मुळशी, मावळ आणि वेल्हा हा पुणे जिल्ह्यातील डोंगराळ भाग आजही दूध उत्पादनात आघाडीवर आहे. (कै.) मामासाहेब मोहोळ यांनी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची पायाभरणी करून शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर माजी आमदार आणि खासदार अशोकराव मोहोळ यांनी संघाचे आधुनिकीकरण केले. धवलक्रांतीचे जनक डॉ. व्हर्गीस कुरियन यांनी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे जाहीर कौतुक केले होते. या सर्व प्रक्रियेचा फायदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना झाला. ‘श्रीराम डेअरी’ हा त्या मोठ्या परिवर्तनाचाच एक भाग आहे. ‘अमूल’सारख्या मोठ्या सहकारी संस्थांबरोबरच अशा लहान-मोठ्या डेअऱ्या, दूध उत्पादक शेतकरी आणि सहकारी संघ यांच्या योगदानामुळेच भारताने जगातील आघाडीचा दूध उत्पादक देश म्हणून आपली ओळख टिकवून ठेवली आहे.
(चौकट २)
-----
भारत दूध उत्पादनात जगात अग्रेसर
-------------------
भारतात २०२३-२४ या आर्थिक वर्षात सुमारे २३.९३ कोटी टन (सुमारे ६५-६६ कोटी लिटर प्रतिदिन) दुधाचे उत्पादन झाले होते. विशेष म्हणजे यामध्ये दरवर्षी पाच ते सहा टक्के इतकी वाढ होत आहे. उत्तर प्रदेश हे राज्य दूध उत्पादनात देशात आघाडीवर असून, त्याचा वाटा जवळपास १५ टक्के आहे. त्यानंतर राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राचा नंबर लागतो. भारतातील दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. या व्यवसायातून आठ कोटींपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांना थेट रोजगार उपलब्ध होतो. भारतातील दुग्ध व्यवसाय क्षेत्रात सुमारे ७१ टक्के महिलांचा सहभाग असून, त्यामुळे ग्रामीण महिला सक्षमीकरणाला मोठा हातभार लागतो. देशातील ९६ हजारांहून अधिक सहकारी संस्थांमार्फत दूध संकलन केले जाते. यातून गावागावात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. देशातील सुमारे ७० टक्के दुग्ध व्यवसाय असंघटित (थेट पशुपालन) आणि ३० टक्के संघटित (डेअरी प्रक्रिया/दूध संघ) क्षेत्राद्वारे चालतो, जो बारमाही उत्पन्नाचा स्रोत आहे.
---------------
फोटो ओळी
----------
१) ‘श्रीराम डेअरी’ची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या पायगुडे परिवारातील सदस्य.
२) ‘श्रीराम डेअरी’ - लोगो
३) ‘श्रीराम डेअरी’ची विविध उत्पादने (दोन फोटो)
-----------------------पूर्ण-----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.