पुणे

न्हावरे फाटा परिसरात एसटी बसवर हल्ला

CD

शिरूर, ता. ५ : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा (ता. शिरूर) येथे एसटी बसला स्कॉर्पिओ जीप आडवी लावून चौघांनी चालक-वाहकाला बेदम मारहाण केली. तसेच, वाहकाकडील सुमारे नऊ हजार रुपयांची रक्कम लुटून नेताना दगडफेक करीत बसची तोडफोड केली. शुक्रवारी (ता. ४) मध्यरात्रीच्या सुमारास बसवरील हल्ल्याच्या या प्रकाराने प्रवाशांमध्येही घबराट पसरली. या थरारक घटनेनंतर विनाक्रमांकाच्या स्कॉर्पिओतून हल्लेखोर पळून गेले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
बसचालक संदीप गणपत थोरवे (रा. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप थोरवे हे आपल्या ताब्यातील पुणे-शिरूर बस (क्र. एमएच १४ एनपी ०८३८) घेऊन पुण्याहून शिरूरकडे येत होते. पहाटे पावणेदोनच्या सुमारास ही बस न्हावरे फाट्याजवळ आली असता एका विनाक्रमांकाच्या काळ्या स्कॉर्पिओ भरधाव येत बसला आडवी घातली. त्यामुळे थोरवे यांनी बस थांबविली असता स्कॉर्पिओतील चौघांनी त्यांना दमदाटी केली. ‘तू आमच्या जीपला बस का घासली?’ असा आरोप करीत त्यांनी चालकाकडे पैशांची मागणी केली. चालक थोरवे यांनी तुमच्या जीपला माझ्या बसचा अजिबात धक्का लागला नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण करण्यास सुरवात केल्याने वाहक सतीश अण्णासाहेब बाचकर हे त्यांना वाचविण्यासाठी आले असता हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण करीत त्यांच्याजवळ प्रवाशांच्या तिकिटातून जमा झालेली आठ हजार ९६० रुपयांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. यावेळी हल्लेखोरांनी आपल्या इतर सहकाऱ्यांना, ‘स्कॉर्पिओतून कोयते काढ रे.’ असे म्हणाल्याने एसटीतील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. एवढे करूनही न थांबता हल्लेखोरांनी तेथे पडलेले दगड उचलून एसटीच्या दिशेने फेकल्याने एसटीची समोरील काच फुटली. त्यानंतर एसटी बस चालू करण्यासाठीची चावी काढून घेत हल्लेखोर निघून गेले.
या प्रकारानंतर घाबरलेल्या चालक- वाहकांनी शिरूर पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चालक-वाहकांनी दिलेल्या माहितीनूसार, हल्लेखोर २५ ते वयोगटातील होते. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमी चालक-वाहकाला शिरूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहेत. संशयित हल्लेखोरांची माहिती मिळविली असून, त्यांच्या मागावर पोलिस पथके रवाना केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिली.

Sonam Wangchuk : तर सोनम वांगचुक भारतातील सर्वात मोठ्या आंदोलनाच्या तयारीत; सरकारने मागणी मान्य न केल्यास काय होणार?

Talegaon Dhamdhere Leopard Attack: तळेगाव ढमढेरेत दोन बिबट्यांचा गोठ्यात धुमाकूळ; ४ मेंढ्या ठार, २३ जखमी, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

IND vs AFG : टीम इंडिया अफगाणिस्तानला घाबरलीय! माजी खेळाडूची निवड समितीवर टीका; म्हणाले, हताश होऊन उचललेले पाऊल...

Marathi News Live Updates: एकनाथ शिंदे फाऊंडेशन २ विद्यार्थ्यांचा दहावीपर्यंत सगळा खर्च करणार

Subhash Chandra: सुभाष चंद्रा यांच्यावर सीबीआयकडून फसवणुकीचा गुन्हा; 'एलआयसी'च्या तक्रारीवरुन मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT