शिरवळ परिसरातील
३४ जणांना प्रवेश मनाई
पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश
खंडाळा, ता. १३ : गणेशोत्सव शांततेत, सलोख्याने व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी शिरवळ पोलिस ठाण्याकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या एकूण ३४ जणांविरुद्ध शिरवळ परिसरात वावरण्यास प्रतिबंधात्मक मनाई आदेश तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी रविराज जाधव यांनी काढले आहे.
आदेशानुसार १४ ते २५ सप्टेंबरअखेर संबंधित व्यक्तींना शिरवळ पोलिस ठाणे हद्द व परिसरात प्रवेश करण्यास तसेच परिसरात वावर करण्यास किंवा थांबण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिरवळ पोलिस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, सार्वजनिक शांतता कायम ठेवणे आणि गणेशोत्सव शांततेत पार पाडणे यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे.
शिरवळ पोलिस ठाण्याकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, काही व्यक्तींच्या हालचाली, उपस्थिती अथवा कृतीमुळे सार्वजनिक शांततेचा भंग होऊन दखलपात्र गंभीर अपराध घडण्याची, तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते.
यानुसार तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी संबंधित व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे. मनाई आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती कारवाईस पात्र राहील, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
------