सिंहगड रस्ता, ता. २ : वडगाव पुलाजवळील सेवा रस्त्याच्या नियोजित पुलाखालून वाहनांना ये-जा करण्यासाठी पुरेशी उंची मिळत नसल्याच्या तक्रारीची दखल घेत महापालिका, महामेट्रो आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच संयुक्त पाहणी केली. या वेळी पुलाच्या खांबांची उंची साडेचार मीटर ठेवण्याबाबत चर्चा होऊन सहमती झाली असून, सर्व विभागांनी मिळून सुधारित आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुलाची नियोजित उंची अपुरी असल्याबाबत नागरिकांनी घेतलेल्या आक्षेपाची बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून कौन्सिल हॉलमध्ये संबंधित विभागांची बैठक झाली. या बैठकीनंतर प्रत्यक्ष ठिकाणी ही पाहणी करण्यात आली. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल ते वारजे दरम्यान सेवा रस्त्यांची कामे सुरू आहेत. वडगाव पुलाजवळ ओढ्यालगतचा रस्ता प्रयेजा सिटी, सनसिटी परिसरातील सोसायट्यांना जोडतो. या रस्त्यावरून जाणाऱ्या पुलाची नियोजित उंची ३.३ मीटर असल्याने स्कूल बस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन केंद्राच्या वाहनांना अडथळा निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली होती.
परिसरातील १२ मीटर रुंदीच्या रस्त्याजवळ मेट्रोचा खांबही प्रस्तावित आहे. त्यामुळे महामार्ग आणि मेट्रोच्या कामांमध्ये समन्वय ठेवून स्थानिक रस्त्यांची जोडणी कायम राखण्यावर पाहणीदरम्यान भर देण्यात आला. महापालिकेचा पथ व प्रकल्प विभाग, महामेट्रो आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी एकत्रित आराखडा तयार करावा, असे ठरले. येत्या १५ दिवसांत संबंधित अधिकारी बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार आहेत.
यापूर्वी १५ ऑक्टोबरला आमदार भीमराव तापकीर यांनीही पाहणी करून काम थांबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. संयुक्त पाहणीवेळी नगरसेवक काका चव्हाण, संदीप रायकर, महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे दिनकर गोजारे, पथ विभागाचे उपअभियंता विजय दाभाडे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सुभाष घंटे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.