पुणे, ता. १७ : ‘‘पत्रकारितेसह समाजाच्या सर्वच क्षेत्रांत विचारांशी प्रामाणिक आणि मूल्यांशी कटिबद्ध राहणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. अशा परिस्थितीत कोणाचे समर्थन मिळते किंवा विरोध होतो, याची चिंता न करता आपल्या विचारांशी प्रामाणिक राहून समाजप्रबोधन, समाजशिक्षण आणि समाजसंस्काराचे काम करणारे ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे,’’ अशा शब्दांत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी गौरवोद्गार काढले.
श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठान यांच्यावतीने ‘सकाळ’चे माजी संपादक, ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी यांच्या पत्रकारितेतील भरीव योगदानाबद्दल नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. महापौर मंजूषा नागपुरे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रतिष्ठानचे कार्यवाह पांडुरंग सांडभोर, श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस हिरा सरवदे आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, ‘‘आज विचारभिन्नतेचा प्रश्न नाही, विचारशून्यतेचा प्रश्न आहे. एखाद्याचा विचार आपल्याला पटला नाही, तरी तो आपल्या विचारांशी प्रामाणिक असेल, तर त्याचा सन्मान केला पाहिजे. मात्र, ‘आज ना उजवे, ना डावे; आम्ही संधिसाधू’ ही प्रवृत्ती वाढत आहे. अशा वातावरणातही कुलकर्णी यांनी वटवृक्षाप्रमाणे आपल्या विचारांशी निष्ठा ठेवून पत्रकारितेचे व्रत जपले. त्यांनी ‘सकाळ’ आणि ‘केसरी’सारख्या वैचारिक व्यासपीठांवर काम करताना व्रतस्थ पत्रकारिता अंगीकारली. कठीण विषयांचा सखोल अभ्यास करून त्याची योग्य बाजू समाजासमोर मांडण्याचे काम त्यांनी केले. एखादी गोष्ट समाजापर्यंत पोहोचली पाहिजे, या भावनेतून त्यांनी आयुष्यभर पत्रकारितेचे व्रत पाळले. ’’
नागपुरे म्हणाल्या, ‘‘कुलकर्णी सरांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करण्यासाठी माझे शब्द आणि माझे वय दोन्ही कमी आहे. त्यांनी पत्रकारिता, लेखन आणि विचारांच्या माध्यमातून ज्ञानाचा चालता-बोलता वटवृक्ष निर्माण केला.’’
एस. के. कुलकर्णी म्हणाले, ‘‘आज तंत्रज्ञानामुळे काही क्षणांत बातमी आणि छायाचित्र मिळतात. त्यामुळे पत्रकारितेला आता वेगळे आकर्षण आणि नावीन्य देण्याची गरज आहे. पत्रकारांच्या लिखाणाची भाषा बिघडली तर लोकांची भाषा बिघडेल. वाचनावर लोकांचा विश्वास असतो. लोकशिक्षण हे वर्तमानपत्राचे कर्तव्य आहे, ही नानासाहेब परुळेकरांची भूमिका होती. त्याच भावनेतून पत्रकारितेचे काम पुढे नेले पाहिजे.’’
उमेश शेळके यांनी प्रास्ताविक केले. हिरा सरवदे यांनी सूत्रसंचालन केले, तर राजेंद्र पाटील यांनी आभार मानले.
तुमच्या विद्वत्तेला नमन करतो...
‘‘पुणे हे विद्वानांचे शहर आहे. त्यामुळे येथे मतभिन्नता असणे स्वाभाविक आहे. मात्र, लोकशाहीत चर्चेसोबतच वेळेवर निर्णय होणेही तितकेच महत्त्वाचे असते. पुणे मेट्रो रस्त्यावरून की भुयारी करायची यावर बैठकीत दीड तास चर्चा सुरू होती. अखेर मी हात जोडले आणि तुमच्या विद्वत्तेला नमन करतो, पण मी सरकारमध्ये आहे; उद्यापासून काम सुरू करा, असा ठाम पवित्रा घेतला आणि मेट्रोच्या कामाला गती मिळाली,’’ असा किस्सा गडकरी यांनी सांगितला.
‘ॲग्रोवन’ आवर्जून वाचतो...
‘‘दिल्लीत असताना ‘सकाळ’चा ‘ॲग्रोवन’ आवर्जून वाचतो. शेतीमध्ये कोणी काय प्रयोग केले, याची माहिती ‘ॲग्रोवन’मधून मिळते. मी स्वतः शेतीत थोडे फार काम करतो. नवोन्मेष, उद्योजकता, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, कौशल्य आणि यशस्वी प्रयोग यांची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम माध्यमे करतात.’’ असे गडकरी यांनी सांगितले.
फोटो ः ४२८६०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.