२६४९४ २६४९५ २६४९६ ... विद्यापीठांनी जागा दिल्यास कौशल्य केंद्राची उभारणी उद्योगमंत्री उदय सामंत : रोजगार मेळाव्याला १७ हजार उमेदवार हजर सकाळ वृत्तसेवा कोल्हापूर, ता. २२ : ‘राज्यातील प्रत्येक विद्यापीठाने दोन एकर जागा दिल्यास त्याठिकाणी शासनातर्फे सुसज्ज आणि अद्ययावत कौशल्य विकास केंद्र निश्चितपणे उभारता येणे शक्य आहे. जेणेकरून स्थानिक पातळीवर युवक-युवतींना आवश्यक कौशल्ये प्रदान करता येतील. प्रशिक्षित मनुष्यबळ घडविणे ही सुद्धा विद्यापीठांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती रोजगार कक्ष, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन आणि विद्यापीठ विकास मंचने घेतलेल्या राज्यस्तरीय नोकरी महामेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव होत्या. खासदार धैर्यशील माने, माजी परराष्ट्र सेवा अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे प्रमुख उपस्थित होते. मागील काही वर्षांत टाटा उद्योग समूहाने सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून राज्यात कौशल्य विकास केंद्रे उभारण्यासाठी ८५० कोटी रुपयांचा निधी दिला. त्या माध्यमातून रतन टाटा कौशल्य विकास केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे. अशा केंद्रांची ठिकठिकाणी उभारणी करून उद्योगांना आवश्यक कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याचे उद्दिष्ट शासन बाळगून असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऑनलाईन संवाद साधला. विद्यापीठाने इतक्या मोठ्या प्रमाणात नोकरी मेळाव्याचे आयोजन केले, याचा आनंद वाटत असून, स्थानिक युवक-युवतींना त्याचा निश्चितपणे लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ विकसित करण्यासाठी महाराष्ट्राचा उद्योग विभाग प्रयत्न करीत असून, त्याचा युवकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा’, असे आवाहन खासदार माने यांनी केले. ‘देशातील गुणवत्तावान युवा पिढीला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. शिक्षण, रोजगार, उद्योजकता विकास ही त्रिसूत्री घेऊन फाउंडेशन काम करीत असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले. विद्यापीठ विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील यांनी युवा पिढीने रोजगारांसाठी आवश्यक विविध जीवनकौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन केले. ‘या महामेळाव्याला उमेदवारांचा लाभलेला प्रतिसाद लक्षणीय स्वरूपाचा आहे. मंत्री सामंत, डॉ. मुळे यांच्या मार्गदर्शनानुसार रोजगाराभिमुख पात्र उमेदवारांना आवश्यक कौशल्ये प्रदान करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ प्रयत्नशील राहील,’ अशी ग्वाही प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांनी दिली. यावेळी सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर, संजय परमणे, जी. बी. दीक्षित आदी उपस्थित होते. विद्यापीठाच्या मध्यवर्ती रोजगार कक्षाचे समन्वयक डॉ. सुभाष कोंबडे यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. ... चौकट १३५ कंपन्यांमध्ये नऊ हजार जागा या नोकरी महामेळाव्यामध्ये एकूण १३५ कंपन्या सहभागी झाल्या. एकूण नऊ हजार जागांसाठी उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या. त्यासाठी विविध अधिविभागांत २५० मुलाखत कक्ष निर्माण केले होते. या मुलाखतींसाठी सुमारे सतरा हजार उमेदवार उपस्थित राहिल्याची माहिती डॉ. कोंबडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.