Panchnama
Panchnama Sakal
पुणे

तेच ते आणि तेच ते!

सु. ल. खुटवड

आपल्या राज्यात पाऊस वेळेवर येईल किंबहुना त्याला महाराष्ट्रात यावंच लागेल. राज्याच्या कानाकोपऱ्यात पाऊस पोचवण्यासाठी मी वचनबद्ध आहे.

आपल्या राज्यात पाऊस वेळेवर येईल किंबहुना त्याला महाराष्ट्रात यावंच लागेल. राज्याच्या कानाकोपऱ्यात पाऊस पोचवण्यासाठी मी वचनबद्ध आहे. मात्र, तरीही पावसानं वेळकाढूपणा केला तर आपण त्याला वेळेत यायला भाग पाडू, यासाठी महाराष्ट्र सरकार सक्षम आहे. सक्षम असलंच पाहिजे? का नाही असणार? किंबहुना ते सक्षम आहे म्हणूनच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. का नाही वाळू सरकणार? सरकलीच पाहिजे. अनेकांची डोकी सरकली आहेत तर वाळूचं काय घेऊन बसलाय? त्यातूनच काहीजण वाळूचे कण रगडून, त्यातून तेल काढायला बसले आहेत. मात्र, एक लक्षात ठेवा, वाळूचे कण रगडून, त्यातून फार तर टोमॅटो सॉस बाहेर येईल, तेल येणार नाही. पत्रकारपरिषदा घेऊन, हनुवटीवर टोमॅटो सॉस लावून, तुम्हाला फारतर मारहाण झाल्याचा कांगावा करता येईल. बिनधास्त करा किंबहुना तो केल्याशिवाय तुम्हाला दिल्लीतून शाबासकी कशी मिळेल?

आमच्या वाट्याला काही येणार असलं की दिल्लीतील सरकार ते अडवायला टपलेलंच असतं. मग ते जीएसटीचा परतावा असो, निधी असो की कोळसा असो. आताही ते महाराष्ट्रात येणारे ढग अडवायला कमी करणार नाहीत पण आम्ही कोणाला घाबरत नाही किंबहुना कोणालाही न घाबरणे, हेच आमचे स्वभाववैशिष्ट्ये आहे. आतापर्यंत आम्हाला ‘ईडी’ची भीती दाखवली. खुशाल दाखवा. आम्हाला काही फरक पडत नाही.

आताही महाराष्ट्राच्या हक्काचा पाऊस गुजरातला पळवून नेण्याचा विरोधकांचा डाव आहे. मात्र, आम्ही तो हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी मराठी माणूस माझ्यामागे खंबीर उभा आहे.

पावसाला महाराष्ट्रापासून तोडण्याची खेळी अनेकजण खेळत आहेत. खुशाल खेळा. तुमच्या या खेळाचा ‘खेळखंडोबा’ झाल्याशिवाय राहणार नाही.

माझा महाराष्ट्र एकवेळ तहानलेला राहील पण दिल्लीसमोर कदापी झुकणार नाही! नाही म्हणजे नाही. किंबहुना कोणापुढं झुकणं, हे आमच्या रक्तात नाही. मुंबई-गुजरात बुलेट ट्रेन तुम्ही कशाला चालू करताय, हे आमच्या आता लक्षात आले आहे. तुम्हाला मुंबईतील ढग बुलेट ट्रेनने गुजरातला न्यायचे आहेत पण लक्षात ठेवा! आमच्या येथील एकही ढग गुजरातपर्यंत आम्ही पोचू देणार नाही. नाही म्हणजे नाही. छातीची ढाल करून, आम्ही ते रोखून धरू.

महाराष्ट्रात पावसापूर्वी आरोप आणि ‘ईडी’च्या छाप्यांचं चक्रीवादळ येऊन, त्यात सरकार उडून जावं, यासाठी काहीजण देव पाण्यात घालून बसले आहेत किंबहुना त्यासाठी विरोधकांकडून रसद पुरवली जात आहे. वास्तविक महाराष्ट्राला ढगांचा गडगडाट हवाय. विरोधकांचं गडगडाटी हास्य नकोय. आम्हाला भोंग्याच्या प्रश्‍नाऐवजी मेघगर्जना हवीय पण काहीजण भोंग्याच्या प्रश्‍नावरून रान पेटवायला निघालेत. आम्हाला मात्र कडक उन्हाने पेटलेले रान पावसामुळे ओलेचिंब झालेले हवंय. वेळेवर पाऊस पडला नाहीतर काहीजण कृत्रिम पावसाचा पर्याय देतात. विमानातून ढगांवर केमिकल फवारून, असा पाऊस पाडला जातो. मात्र, असा ‘केमिकल लोच्या’ असलेला पाऊस महाराष्ट्राला नकोय. तो महाराष्ट्रासारख्या राज्याला परवडणारा नाही, एवढं मी सांगू शकतो. काहीजण महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला असताना आपण स्वतः विमानातून केमिकल फवारून पाऊस पाडलाय, असे फुशारकीनं सांगत आहेत. मात्र, त्यांच्या वजनानं पाऊस पडण्याऐवजी विमानच पडायची आम्हाला भीती वाटते.

समजा काही कारणानं महाराष्ट्रात लवकर पाऊस पडला नाहीतर केंद्राने आम्हाला किमान ढग तरी पुरवावेत, एवढी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो.

ता. क. आमची पावसात चिंब भिजायची तयारी झाली आहे पण पावसाची तयारी आहे का आमच्यासोबत भिजायची, ते एकदा पावसानं ठरवावं.

(हा मजकूर असलेला कागदाचा बोळा आम्हाला नवी मुंबईत मिळाला. मात्र, त्यावर पावसाचे पाणी पडल्याने बरीचशी अक्षरे धुतली गेली होती.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda : वादग्रस्त विधानानंतर सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; जयराम रमेश यांनी दिली माहिती

SRH vs LSG Live Score : लखनौची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

SCROLL FOR NEXT