Panchnama
Panchnama Sakal
पुणे

न येणाऱ्या पत्रासाठी थोडे अश्रू, थोडं हास्य!

सु. ल. खुटवड

‘अहो एक बटवडा द्या. अगदी झणझणीत आणि गरम पाहिजे हं आणि चटणी अजिबात नकोय. ती आमच्या जिभेवर जन्मताच असते.’

‘अहो एक बटवडा द्या. अगदी झणझणीत आणि गरम पाहिजे हं आणि चटणी अजिबात नकोय. ती आमच्या जिभेवर जन्मताच असते.’ पोस्टऑफिसमधील खिडकीतील कर्मचाऱ्याला जनूभाऊंनी ऑर्डर दिली. त्यावेळी तो कर्मचारी चांगलाच दचकला.

‘अहो, तुम्हाला बटाटेवडा हवाय का? तुम्ही चुकून पोस्टऑफिसमध्ये आलाय.’ त्या कर्मचाऱ्याने खुलासा केला.

‘मग ‘बटवडा - सकाळी नऊ व दुपारी एक’ ही पाटी काय भिंतीची शोभा वाढवण्यासाठी लावलीय का? आता बरोबर एक वाजतोय. मला भूकही लागलीय. त्यामुळं तुम्ही गरमागरम बटवडा द्या पाहू. आम्ही काय तुमचे पैसे बुडवणार नाही.’ जनूभाऊंनी खात्री दिली.

‘अहो बटवडा म्हणजे पत्रांचे वाटप असते. ते आम्ही सकाळी नऊ व दुपारी एकला करत असतो. बटाटावड्याशी याचा काही संबंध नसतो.’ कर्मचाऱ्याने उत्तर दिले.

‘मागं तुम्ही पोस्टऑफिसमध्ये छोटे फ्रिज विकत होता ना. मला वाटलं आता बटाटेवड्यासारखं काहीतरी विकायला लागलाय.’ जनूभाऊंनी म्हटलं.

‘हे पहा, मला भरपूर कामं आहेत.’ कर्मचाऱ्याने म्हटले.

‘मग मी काय रिकामटेकडा आहे का? कधी नव्हे ते आम्ही पोस्ट ऑफिसात आलो, तर तुम्ही असं तुसड्यासारखं काय वागताय? साधा चहा तरी विचारलात का? कोल्ड्रिक्सचं तर लांब राहिलं.

तुमच्या अशा वागणुकीमुळेच कोणी इकडं फिरकत नाही. आमच्या लहानपणी असं नव्हतं. त्यावेळी किती गर्दी असायची.’ जनूभाऊंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

‘इथं येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही काय चहापाणी करत बसू का?’ कर्मचाऱ्यानं त्रासिक मुद्रेने म्हटलं.

‘विचारलं तर काय हरकत आहे? चहापाण्याचं शक्य नसेल तर लिंबू सरबताचं विचारा. लोकांची पोस्टाशी असलेली नाळ अशी तुटता कामा नये.’ जनूभाऊंनी म्हटले.

‘बरं तुमचं काय काम आहे?’ कर्मचाऱ्याने संयमाने विचारले.

‘अहो, गेल्या कित्येक वर्षांत मी पोस्टमनच पाहिला नाही. त्यांचं दिसणंही फारच दुर्मिळ झालंय. पूर्वी खाकी गणवेशात येणाऱ्या पोस्टमनची आम्ही किती आतुरतेने वाट पाहायचो. कोणाचं तरी पत्र आली असेल? कोणीतरी खुशाली कळवली असेल, कोणी परीक्षेत पास झालं असेल? कोणी गावाला व्यवस्थित पोचलं असेल. नात्यातील एखाद्या मुलीचं बाळंतपण सुखरूप पार पडलं असेल, असं सांगणारी पत्रं यायची. केवढा आनंद व्हायचा आम्हाला. आता ईमेल नाहीतर व्हॉटसअपवर मेसेज पाठवला जातो. पण पोस्टमनने आणून दिलेल्या पत्राची सर त्यात अजिबात नसते.’ असं म्हणून जनूभाऊंच्या डोळ्यांत पाणी दाटलं.

‘पूर्वी दिवाळीला पोस्त न्यायला पोस्टमन यायचा. त्यावेळी माझी बायको त्यांना निरांजनाने ओवाळायची. फराळासह पोस्त द्यायची. त्यावेळी पोस्टमनच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहायचा. या ऋणानुबंधांना काळाची नजर लागली आणि आधुनिकतेच्या नावाखाली आपुलकीने ओतप्रोत भरलेली पत्रं येण्याचीच बंद झाली. आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांनी कोणाची वाट पाहत दिवस काढायचे हो?’ गळ्यातील आवंढा गिळत जनूभाऊंनी म्हटले.

‘पोस्टमनला डोळं भरून पाहण्यासाठी मी पोस्टात आलोय. त्यांच्याबरोबर सेल्फी काढावा, हा हेतू आहे.’ जनूभाऊंनी म्हटलं. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याने पोस्टमनला बोलावलं. जनूभाऊंनी त्यांच्यासोबत फोटो घेतला. शंभर रुपयांची पोस्त पोस्टमनच्या हातावर टेकवली.

‘अरे बाबा! आमच्या घराला वर्षातून एक-दोनदा का होईना पाय लावत जा रे.’ असे म्हणून त्यांनी पुन्हा डोळे टिपले. तेवढ्यात मघाच्या कर्मचाऱ्याने शेजारच्या हॉटेलमधून गरमागरम वडापाव आणले.

‘आजोबा, हल्ली आमच्याशी कोणी एवढं प्रेमानं बोलत नाही. काळाच्या ओघात सगळ्यांचंच दुर्लक्ष झालंय पण तुम्ही फार आपुलकीने आमच्याशी बोललात म्हणून आमच्यातर्फे तुमच्यासाठी गरमागरम बटवडा. सॉरी बटाटेवडा.’ कर्मचाऱ्याच्या या बोलण्यावर सगळेजण हास्यकल्लोळात बुडाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT