‘स्मार्ट सिटी’च अस्वच्छ - भाग २
पांडुरंग सरोदे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ८ : शहरामध्ये स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय असताना महिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न आणखीच गंभीर असल्याची सद्यःस्थिती आहे. मध्यवर्ती भागात अवघी बोटावर मोजण्याइतकीच महिलांची स्वच्छतागृहे आहेत, तर प्रमुख रस्ते, उपनगरे व समाविष्ट गावांमध्ये ती शोधूनही सापडत नाहीत. उपलब्ध स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता, पाण्याचा अभाव आहे. दिवे नसल्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होत आहे. परिणामी महिला या स्वच्छतागृहांचा वापर करणे टाळत असल्याचे चित्र आहे.
खरेदीसह विविध प्रकारची कामे तसेच विविध सण, उत्सव, पर्यटन व समारंभाच्या निमित्ताने शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठा, प्रमुख रस्ते, उपनगरांमध्ये मोठ्या संख्येने महिला, तरुणी घराबाहेर पडतात. अनेकदा खरेदी किंवा विविध प्रकारची कामे पूर्ण होण्यास बराच कालावधी लागतो. त्यावेळी महिला, तरुणी, लहान मुलींकडून स्वच्छतागृहांचा वापर होतो. मात्र बहुतांश ठिकाणी पुरुषांसाठीच्या स्वच्छतागृहांच्या तुलनेत महिला स्वच्छतागृहांची संख्या पुरेशा प्रमाणात नाही.
शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये महिलांची सर्वाधिक वर्दळ असते. त्यामुळे या भागात महिलांसाठी स्वच्छतागृहांची संख्या देखील तितकीच असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात महात्मा फुले मंडई, तुळशीबाग वगळता उर्वरित ठिकाणी स्वच्छतागृहे शोधत फिरण्याची वेळ महिलांवर येते. जेथे महिलांची स्वच्छतागृहे आहेत, त्या ठिकाणी वीज, पाणी, नियमित स्वच्छतेचा कमालीचा अभाव आहे. काही ठिकाणची स्वच्छतागृहे बंद अवस्थेत आहेत. अनेकदा स्वच्छतागृहांभोवती गर्दुल्ल्यांचा व मद्यपींचा वावर असतो. त्यामुळे अस्वच्छतेबरोबरच सुरक्षिततेच्या कारणांमुळे महिलांची पावले स्वच्छतागृहांकडे वळत नाहीत. शहरात वस्त्यांमध्ये महिलांसाठी सार्वजनिक शौचालये आहेत, मात्र तेथेही स्वच्छता होत नाही, पाणी नसल्याचे कारण पुढे करून स्वच्छतेकडे महापालिका कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
उपनगरे, समाविष्ट गावांमध्ये स्वच्छतागृहे गायब
शहरात काही प्रमाणात स्वच्छतागृहे दिसत असल्याचे किमान समाधान आहे. याऊलट शहरातील उपनगरे, समाविष्ट गावांमध्ये महिलांसाठीची स्वच्छतागृहे शोधूनही सापडत नाहीत. तेथे महिलांसाठी स्वच्छतागृहे असावीत, असे तेथील नगरसेवकांनाही वाटत नाही. परिणामी उघड्यावर लघुशंकेस, शौचास बसण्याच्या घटना घडत असल्याचे चित्र दिसून येते. अपवादात्मक ठिकाणी स्वच्छतागृहे असतात, तेथे महिला जाऊ शकत नाहीत, अशी त्यांची अवस्था आहे.
खासगी संस्था, सोसायट्यांकडे आर्जव करण्याची वेळ
महापालिकेच्या स्वच्छतागृहांच्या दयनीय अवस्थेसह वेगवेगळ्या कारणांमुळे महिला तेथे जाण्यास टाळतात. विशेषतः उत्सवाच्या काळात किंवा खरेदीच्या निमित्ताने शहरात येणाऱ्या महिलांना वेळप्रसंगी शहराच्या मध्यवर्ती भागातील खासगी संस्था, सोसायट्या, शाळा यांच्याकडे आर्जव करून स्वच्छतागृहांचा वापर करण्याची वेळ येते.
महिला स्वच्छतागृहांची सद्यःस्थिती
- पाणी, वीज, स्वच्छतेचा प्रचंड अभाव
- स्वच्छतागृहांच्या नियमित स्वच्छतेकडे महापालिकेचे दुर्लक्ष
- प्रचंड दुर्गंधी व सुरक्षिततेच्या कारणांमुळे महिलांची स्वच्छतागृहांकडे पाठ
- सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल व व्हेंडिंग मशीनची कमतरता
मी, माझ्या कुटुंबातील वृद्ध महिलांसमवेत खरेदीसाठी शहरात येते. तीन ते चार तास खरेदीमध्ये जातात. विविध आजारांमुळे वृद्ध महिलांना स्वच्छतागृहात जावे लागते. मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात महिलांसाठी चांगली स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे त्यांची गैरसोय होते. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो.
- निकीता पानसरे, गृहिणी
शहरात कुठेही महिलांसाठी स्वच्छतागृहे दिसत नाहीत. काही स्वच्छतागृहे बंद झाली आहेत, तर उपलब्ध असणारी स्वच्छतागृहे अतिशय खराब अवस्थेत आहेत. तेथे जाणे खरोखरच शक्य होत नाही.
- संध्या बोमण्णा, गृहिणी