चारा दीड महिन्याचाच; पुढे जनावरे जगवायची कशी?
८२७ क्विंटल बियाणांचे वाटप सुरू; चारा तयार होण्यासाठी किमान तीन महिने, पशुपालकांसमोर दुहेरी संकट
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २९ : जिल्ह्यातील सुमारे १८ लाख पशुधनासाठी केवळ दीड महिना पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे. चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने ८२६.९५ क्विंटल चारा बियाणांचे वाटप सुरू केले असले, तरी त्यापासून चारा उपलब्ध होण्यासाठी किमान तीन महिने लागणार आहेत. त्यामुळे बियाणे वाटपाचा दिलासा मिळाला, तरी मधल्या काळात जनावरे जगवायची कशी, असा गंभीर प्रश्न पशुपालकांसमोर उभा ठाकला आहे. दुष्काळाची चाहूल लागल्यानंतरही चारा उपलब्धतेच्या नियोजनातील विलंबाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. पशुसंवर्धन विभागाने महाबीजकडे ९७६.९५ क्विंटल चारा बियाणांची मागणी केली होती. त्यापैकी ८२६.९५ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असून ज्वारी व मक्याच्या बियाणांचे तालुकानिहाय वितरण सुरू आहे. सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्याच्या निकषावर शंभर टक्के अनुदानातून बियाणे दिले जाणार आहे. मात्र, पेरणीनंतर चारा तयार होण्यास लागणारा कालावधी पाहता हा उपाय तातडीच्या टंचाईवर मात करण्यास अपुरा ठरण्याची शक्यता आहे.
तापमान वाढू लागल्याने विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळीही घटत आहे. उजनीतून नदीत सोडलेल्या पाण्याचे नियोजन, नदीकाठच्या शेतीसाठी केवळ तीन तासांचा वीजपुरवठा आणि अरळी बंधाऱ्यापुढे पाणी न सोडण्याच्या निर्णयामुळे त्याखालील भीमा व सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सिंचनच अनिश्चित असल्याने चारा पिके घेण्याचे आव्हानही मोठे आहे.
चौकट
ज्वारीच्या जिल्ह्यात रब्बीची पेरणी ठप्प
‘ज्वारीचे कोठार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारीची सरासरी पेरणी दोन लाख ७५ हजार हेक्टर असताना प्रत्यक्ष पेरणी केवळ ११ हजार ८६६ हेक्टरवर झाली आहे. म्हणजे अवघी चार टक्के पेरणी झाली आहे. मक्याचे सरासरी क्षेत्र ४७ हजार हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी सहा हजार ८३५ हेक्टरवर, म्हणजे १५ टक्के क्षेत्रावर झाली आहे. पाण्याअभावी पेरणी घटल्याने आगामी काळात चारा उपलब्धतेचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.
PNE26W62642
जिल्ह्यात आणखी दीड महिना पुरेल इतका चारा उपलब्ध आहे. चारा बियाणांचे वितरण सुरू असून येत्या चार-पाच दिवसांत ते पूर्ण होईल. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे दिले जात आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध चाऱ्याचा मुरघास तयार करून साठवणूक करावी, यासाठी जनजागृती केली जात आहे.
- डॉ. विशाल येवले, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.