१३ लाख लोकसंख्येला स्मार्ट सिटीत २५०० ‘सीसीटीव्ही’
‘सीसीटीव्ही’मुळे ६० टक्के गुन्हे उघडकीस; सुरक्षेसाठी प्रत्येकाने कॅमेरे बसविण्याचे पोलिसांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ११ : शहराची लोकसंख्या १३ लाखांवर पोचली आहे. शहरात अडीच लाख मिळकतदार आहेत; मात्र, ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांची संख्या अडीच हजारांपेक्षाही कमी आहे. तुळजापूर, बीड, पुणे अशा शहरांमध्ये ‘एआय’युक्त ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे आहेत. त्यामध्ये संशयिताचा फोटो किंवा वाहन क्रमांक टाकल्यावर तो शहरात कोठे-कोठे फिरला, याची माहिती मिळते. मात्र, सोलापुरात स्मार्ट सिटी प्रकल्पातून ३३१ साधे कॅमेरे बसविण्यात आले असून, त्यातील ३८ कॅमेरे आता बंद आहेत.
सोलापूर शहरात दरमहा चोरी, घरफोडीचे सरासरी २३ ते २८ गुन्हे दाखल होतात. खून, खुनाचा प्रयत्न यांसह अन्य गुन्हेही दाखल होतात. अशा गुन्ह्यांमधील चोरटे, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांना संबंधित परिसरातील ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांची मदत होते. मात्र, जुळे सोलापूरसह अन्य नगरांमध्ये मुले शिक्षण, नोकरीसाठी परजिल्ह्यात आणि ज्येष्ठ आई-वडीलच घरी, अशीही कुटुंबे आहेत. काही जण घर बंद करून गावी जातात. मुले शाळेत, पतिपत्नी नोकरीला असताना देखील घरे बंद असतात. चोरटे अशा घरांवर डोळा ठेवून चोरी करतात, अशाही घटना घडल्या आहेत.
मात्र, अनेकांच्या घरासमोर, व्यावसायिक आस्थापनांसमोर, अपार्टमेंटमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरेच नाहीत. शहरातील बहुतांश ‘एटीएम’मध्येही अशीच अवस्था आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रत्येकाने स्वतःच्या सुरक्षेसाठी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवून घ्यावेत, असे आवाहन केले आहे. ज्या परिसरात किंवा घरासमोर ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे नाहीत, तेथील चोरीच्या गुन्ह्यांचा अजूनही शोध लागलेला नाही.
-------------------------------
चोरटे सापडले नाहीत
१) विडी घरकुलामधील सग्गम नगर येथील एका बँकेचे ‘एटीएम’ मशीनच चोरट्याने मोटारीत घालून १६ मे रोजी पहाटेच्या सुमारास चोरून नेले होते. पोलिसांना नुसते मशीन सापडले; मात्र, पैसे सापडलेच नाहीत. चार महिन्यांपासून एमआयडीसी व शहर गुन्हे शाखेचे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत; मात्र, ते सापडलेले नाहीत. यात पोलिसांना ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांची फारशी मदत झाली नाही.
२) वसंत विहारमधील बलदवा हॉस्पिटलजवळील अमर पवार यांच्या घरी २२ जून रोजी चोरी झाली होती. चोरट्याने दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या घरातून सुमारे २५ तोळे दागिने चोरून नेले होते. शहर गुन्हे शाखा व फौजदार चावडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र, ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे नसल्याने या चोरीतील चोरटे अजूनही सापडलेले नाहीत.
---------------------------
‘सोलापूर शहरात लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशा प्रमाणात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे नाहीत. सुरक्षेच्या अनुषंगाने कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे. चोरी, दरोडा, घरफोडीसह अन्य गंभीर गुन्ह्यांतील आरोपींच्या शोधासाठी पोलिसांना ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांची मोठी मदत होते. एकूण दाखल गुन्ह्यांपैकी ६० टक्के गुन्हे ‘सीसीटीव्ही’मुळेच उघडकीस येतात.’
- अरविंद माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शहर गुन्हे शाखा, सोलापूर
---------------------------
बीडमधून एक चोरटा आणला
जेवण करून कुत्र्याला घेऊन घराबाहेर फिरताना १ सप्टेंबरला एका चोरट्याने नागनाथ अंबाजी गोरट्याल यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावून नेली होती. हा प्रकार न्यू पाच्छा पेठेत घडला होता. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने यातील एका चोरट्याला बीडमधून शोधून आणले आहे. यासाठीही पोलिसांना ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांचीच मदत झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.