ही बातमी घेणे...
सोलापूरवर दुष्काळाचे सावट; पावसाची ५३.५७ टक्के तूट
अनेक तालुक्यांत २५ ते ४२ दिवसांचा पावसाचा खंड, उत्पादन क्षमतेवर गंभीर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १४ : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाचे असमान वितरण, ऑगस्टमधील अत्यल्प पर्जन्यमान आणि दीर्घ पावसाच्या खंडामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४८१ मिलिमीटर असताना प्रत्यक्षात १९७.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, जून ते सप्टेंबर २०२६ अखेर ५३.५७ टक्के तूट दिसून येत आहे. पावसाचे स्वरूप अनियमित व खंडित राहिल्याने जिल्ह्यात वारंवार पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या दुष्काळ परिस्थिती अहवालातून स्पष्ट झाले आहे.
जून २०२६ मध्ये जिल्ह्यात सरासरीच्या ८० टक्के, तर जुलै २०२६ मध्येही ८० टक्के पर्जन्यमान झाले. मात्र, ऑगस्टमध्ये केवळ १०७.५० मिलिमीटर म्हणजेच ३९.९० टक्के पर्जन्यमान झाले. ११ सप्टेंबर २०२६ पर्यंतचा एकत्रित विचार करता जिल्ह्यात सरासरीच्या ५३.५७ टक्के पर्जन्यमान झाले असून, ४६.४३ टक्के तूट राहिली आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात २५ ते ४२ दिवसांचा मोठा पावसाचा खंड पडला. करमाळा, माढा, माळशिरस आणि मोहोळ तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये ३५ ते ४२ दिवस पाऊस झालेला नाही.
................
९ तालुक्यांतील ५७ गावांना टँकरचा आधार
पावसाअभावी जिल्ह्यातील पाणीटंचाईची परिस्थितीही गंभीर झाली आहे. १२ तालुक्यांपैकी ९ तालुक्यांतील ५७ गावे आणि २२५ वाड्यांमध्ये एकूण ४३ टँकर सुरू आहेत. यामध्ये अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माढा, मंगळवेढा, माळशिरस, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि सांगोला या तालुक्यांचा समावेश आहे. खरीप हंगाम २०२६ मध्ये जिल्ह्यात खरीप सरासरी क्षेत्र ३,३७,९६८ हेक्टर असून प्रत्यक्षात ३,५६,९१८ हेक्टरवर म्हणजेच १०५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
....
उजनीत ९९.८१ टक्के पाणीसाठा
जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्याच्या स्थितीत उजनी प्रकल्पाचा ९ सप्टेंबर २०२६ रोजीचा एकूण पाणीसाठा ११७.१७ टीएमसी म्हणजे ९९.८१ टक्के आहे. मध्यम प्रकल्प एकरुखचा साठा ३८.०२ टक्के, हिंगणी ८.४५, जवळगाव १९.६०, मांगी १९.४७, आष्टी ७१.९७, बोरी ३.६६ तर पिंपळगाव (ढा) -१२.८८ टक्के आहे. लघु प्रकल्पांत (५६) २.८८ टक्के, तर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये केवळ ५.७५ टक्के पाणीसाठा आहे.
.....
माढ्यात पेरणी केवळ ५९.३ टक्के
तालुकानिहाय पेरणीचा विचार करता पंढरपूरमध्ये १६५.४ टक्के, उत्तर सोलापूरमध्ये १४८.७ टक्के, करमाळ्यात १३६.१ टक्के आणि मोहोळमध्ये १२८.६ टक्के पेरणी झाली आहे. या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पेरणी झाली असली तरी माढा तालुक्यात केवळ ५९.३ टक्के पेरणी झाली आहे. सोयाबीनचे १,३०,३०४ हेक्टर आणि मक्याचे ८१,८८८ हेक्टर क्षेत्र आहे. पावसाच्या दीर्घ ताणामुळे ही पिके सुकली असून वाढ खुंटली आहे. त्यातच कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुगाचे ३,९०४ हेक्टर आणि उडदाचे ३९,९६५ हेक्टर पीक काढणी अथवा पक्वतेच्या अवस्थेत आहे. फुलोरा व शेंगा भरण्याच्या वेळी पाऊस न झाल्याने उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तुरीचे ७४,१७३ हेक्टर आणि बाजरीचे १७,०६४ हेक्टर क्षेत्र असून, तुरीची वाढ पावसाअभावी खुंटली आहे, तर बाजरीची पिके सुकू लागली आहेत.
....
कांदा क्षेत्रात मोठी घट
कांदा पीक दृष्टिक्षेप २०२६-२७ नुसार जिल्ह्यात कांदा क्षेत्रात मोठी घसरण झाली आहे. ऐतिहासिक सरासरी कांदा क्षेत्र २८,५१९ हेक्टर आहे. २०२५-२६ मध्ये हे क्षेत्र ४०,४२० हेक्टरवर पोहोचले होते. मात्र, चालू २०२६-२७ हंगामात हे क्षेत्र सरून १८,८५८ हेक्टर म्हणजेच सरासरीच्या ६६ टक्क्यांवर आले आहे. तालुकानिहाय विचार करता दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वाधिक ६,५०४ हेक्टर कांदा लागवड झाली आहे. तर उत्तर सोलापूरमध्ये १५५ हेक्टर, मोहोळमध्ये ३३२ हेक्टर आणि बार्शीत ८०४ हेक्टर कांदा लागवड झाली आहे. या तालुक्यांमध्ये कांदा लागवडीत अत्यंत मोठी घट झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.