SLC26B30158
सोलापूर ः विद्यापीठात ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ कार्यक्रमात बोलताना उदय सामंत, व्यासपीठावर खासदार ज्योती वाघमारे, कुलगुरू प्रकाश महानवर, आमदार सुभाष देशमुख व अन्य.
समाज माध्यमातही संवादातही भाषेची मर्यादा जपली पाहिजे
मंत्री उजय सामंत; ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ कार्यक्रम, सोलापुरात मोठा उद्योग आणण्याचे आश्वासन
उ. सोलापूर, ता. ६ ः विद्यार्थ्यांनी हक्कांसाठी लढताना कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा नेत्याला आपला वापर करू देऊ नये. महाराष्ट्राची संस्कृती संयम, आदर आणि संस्कारांची असून सोशल मीडियावरील संवादातही भाषेची मर्यादा जपली पाहिजे, असे आवाहन उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.
मंगळवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी खासदार ज्योती वाघमारे, आमदार सुभाष देशमुख, कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू लक्ष्मीकांत दामा, डॉ. दिवाकर कुलकर्णी, कुलसचिव डॉ. अतुल लकाडे आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, एमपीएससी परीक्षांमध्ये पारदर्शकता राखणे आणि पेपरफुटी रोखणे ही शासनाची ठाम भूमिका आहे. मोबाईल, गुगल आणि एआयच्या युगात कोणत्याही माहितीची क्षणार्धात पडताळणी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सत्य आणि विश्वासार्ह ज्ञान देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
सोलापूरच्या दुष्काळी ११ तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्याची अंमलबजावणी तपासण्याच्या सूचना कुलगुरूंना दिल्याचे सांगितले. शैक्षणिक कर्जाच्या वसुलीसाठी बँकांनी सक्ती करू नये, अशी सूचनाही त्यांनी केली. आचारसंहिता संपल्यानंतर सोलापूरच्या एमआयडीसीमध्ये मोठा उद्योग आणण्यासाठी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले.
प्रास्ताविक कुलगुरू डॉ. महानवर यांनी केले. विद्यापीठात १४६ कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरू असून १३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी हे अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सुमारे ३५ हजार विद्यार्थी-शिक्षक ऑनलाइन कार्यक्रम पाहत असल्याचेही त्यांनी नमूद केले. ‘सारेगमपा’ विजेते अभिजित कोसंबी, प्रसेनजित कोसंबी तसेच सुभाष नकाशे यांच्या पथकाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. निवेदन अभिनेते दिगंबर नाईक यांनी, तर सूत्रसंचालन तेजस्विनी कांबळे यांनी केले.
चौकट
तरुणांच्या स्थलांतराला उद्योग हाच पर्याय ः खा. वाघमारे
सोलापुरातील तरुणांना रोजगारासाठी पुणे, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादकडे स्थलांतर करावे लागू नये, यासाठी सोलापुरात मोठे उद्योग आणण्याची गरज आहे. उद्योगांअभावी शहराची लोकसंख्या घटत असून सोलापूर ‘वृद्धांचे शहर’ बनत चालले आहे, अशी खंत खासदार ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केली. एमआयडीसीमध्ये मोठा उद्योग सुरू करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.