करवसुली घटल्याने विकासकामांना कात्री !
महापालिकेची सात महिन्यांत १२२ कोटींची वसुली; गतवर्षीपेक्षा ५० कोटी कमी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३० ः सोलापूर महापालिकेच्या करवसुलीचा वेग मंदावला असून, त्याचा परिणाम विकासकामांवर होण्याची शक्यता आहे. एप्रिल ते ऑक्टोबरअखेर यंदा १२२ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत १७० कोटी रुपये जमा झाले होते. म्हणजेच यंदा वसुलीत ५० कोटी रुपयांची घट झाली आहे. निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ २५ टक्के वसुली झाली आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या भांडवली निधीलाही कात्री लागण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेने चालू आर्थिक वर्षासाठी ४७० कोटी रुपयांचे करवसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यात चालू वर्षाची २०१ कोटी रुपयांची मागणी व मागील थकबाकीचे ५६९ कोटी रुपये आहेत. मात्र, सात महिन्यांत अपेक्षित वसुली न झाल्याने मनपाच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक नगरसेवकासाठी भांडवली व प्रभागनिहाय कामांसाठी एकूण ६४ लाख रुपयांची तरतूद आहे. पहिल्या टप्प्यात २५ लाख रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित निधीचे वितरण मनपाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन केले जाणार आहे. त्यामुळे नगरसेवकांना उर्वरित निधीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
करवसुलीचा वेग वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनावर दबाव आणला जात आहे. मात्र, एसआयआर आणि मिळकतींच्या सर्वेक्षणाच्या कामामुळे करवसुली विभागातील कर्मचारी मोहिमेला पुरेसा वेळ देऊ शकले नसल्याचे सांगितले जात आहे. वसुली वाढली नाही, तर प्रभागातील छोट्या विकासकामांनाही आर्थिक मर्यादांचा फटका बसू शकतो.
------------------------
आकडे बोलतात
- गतवर्षीची वसुली (एप्रिल ते ऑक्टोबर) : १७० कोटी रुपये
- यंदाची वसुली (एप्रिल ते ऑक्टोबर) : १२० कोटी रुपये
- चालू वर्षाची मागणी : २०१ कोटी रुपये
- मागील थकबाकी : ५६९ कोटी रुपये
- यंदाचे वसुली उद्दिष्ट : ४७० कोटी रुपये
------------------------
कोट
आतापर्यंत १२२ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वसुली कमी आहे. कर विभागातील बहुतांश कर्मचारी एसआयआरच्या कामात गुंतले होते. तसेच मिळकतींचे सर्वेक्षण सुरू असल्याने त्याचा परिणाम वसुलीवर झाला. उर्वरित महिन्यांत उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न आहे.
- युवराज गाडेकर, सहायक आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.