PNE26W42995 सोलापूर ः प्रादेशिक परिवहन कार्यालयात अमराठी रिक्षाचालकांना भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान करताना प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असिफ मुलाणी, प्रिया बसवंती आदी.
मराठी न शिकणाऱ्या रिक्षाचालकांवर आजपासून कारवाई
मुदत देऊन परवाना, त्यानंतर परमिट रद्द करण्याची प्रक्रिया; २१५ अमराठी रिक्षाचालकांना भाषा प्रमाणपत्र
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १७ : मराठी भाषा प्रशिक्षण न घेतलेल्या रिक्षाचालकांवर मंगळवारपासून (ता. १८) प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई सुरू करण्यात येणार आहे. कारवाईपूर्वी संबंधित चालकांना मुदत देण्यात येणार असून, त्यानंतरही मराठी भाषेत संवाद साधता न आल्यास प्रथम वाहन चालविण्याचा परवाना आणि त्यानंतर रिक्षाचे परमिट रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे. मात्र, यासंदर्भातील अधिकृत आदेश अद्याप प्राप्त झाले नसल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारच्या ‘महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा’ उपक्रमांतर्गत अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी १५ ऑगस्ट ही मुदत देण्यात आली होती. सोलापूर शहर बहुभाषिक असल्याने हिंदी, कन्नड, तेलुगूसह अन्य भाषिक रिक्षाचालक मोठ्या संख्येने आहेत. प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा, यासाठी अमराठी चालकांसाठी भाषा प्रशिक्षण वर्ग आणि कार्यशाळा घेण्यात येत आहेत.
दरम्यान, मराठी भाषा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २१५ अमराठी रिक्षाचालकांना सोमवारी (ता. १७) मराठी भाषा प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असिफ मुलाणी, मराठी भाषा केंद्राच्या संचालिका प्रिया बसवंती आदी उपस्थित होते.
प्रशिक्षणासाठी चालकांना चार सत्रांमध्ये मराठी भाषा शिकविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जात आहे. यापुढे उर्वरित अमराठी रिक्षाचालकांनीही प्रशिक्षण घेऊन कारवाई टाळावी, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
कारवाईची संभाव्य क्रमवारी
- मराठी भाषा न येणाऱ्या चालकाची तपासणी
- प्रथम मुदत देऊन प्रशिक्षणाची संधी
- त्यानंतरही मराठीत संवाद साधता न आल्यास ड्रायव्हिंग लायसन्स रद्द
- पुढील टप्प्यात रिक्षा परमिट रद्द करण्याची कारवाई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.