जिल्ह्यात तब्बल ३९२ कोटींची ऊसबिले थकीत
-----------
हंगाम संपूनही शेतकरी प्रतीक्षेत, साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक
ॲग्रोवन वृत्तसेवा
माळीनगर, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योगाने यंदाच्या हंगामात विक्रमी गाळप करून हजारो कोटींची उलाढाल केली असली, तरी बळिराजाच्या पदरात मात्र अद्याप हक्काचे पैसे पडलेले नाहीत. साखर आयुक्तालयाच्या १५ जूनअखेरच्या अधिकृत अहवालानुसार जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांकडे तब्बल ८७ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. तर कारखान्यांनी स्वतः जाहीर केलेल्या अंतिम ऊस दरानुसार २३ कारखान्यांकडे तब्बल ३९२ कोटी रुपयांची ऊसबिले अडकून पडली आहेत. हंगाम संपून महिने उलटले तरी पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील ३५ साखर कारखान्यांमध्ये एकूण १ कोटी ५९ लाख ६९ हजार ७ मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप झाले. त्यापोटी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ४ हजार २९१ कोटी रुपयांची ऊसबिले जमा करण्यात आली आहेत. परंतु, हंगाम संपून चार महिने उलटले आणि अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप होऊन सहा महिने पूर्ण झाले तरी उर्वरित शिल्लक बिले मिळालेली नाहीत. साखर आयुक्तांकडून होणारी जप्तीची (आरआरसी) कारवाई टाळण्यासाठी काही कारखानदार केवळ कायदेशीर एफआरपीची रक्कम अदा करून आपली जबाबदारी झटकत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनांकडून केला जात आहे. कारखान्यांनी स्वतः जाहीर केलेल्या अंतिम ऊस दराची उर्वरित रक्कम देण्यास कमालीची टाळाटाळ सुरू असल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
---
चौकट-१
-
आंदोलनानंतरही आश्वासने हवेतच
---
धोत्री येथील ''गोकूळ शुगर्स''सह इतर काही कारखान्यांच्या थकीत ऊसबिलांसाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागले होते. आंदोलनानंतर प्रशासनाने आणि कारखानदारांनी बिले तातडीने अदा करण्याची आश्वासने दिली होती. परंतु, प्रत्यक्षात अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे फसवणूक झालेले शेतकरी आता पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाच्या भूमिकेत आले आहेत.
---------------------
चौकट-२
-
कारखानानिहाय थकीत एफआरपी (कोटी रुपयांमध्ये):
---
-सिद्धेश्वर कारखाना: ३०.३४ कोटी
-भीमा कारखाना: १९.७२ कोटी
-संत कुर्मदास कारखाना: १५.९८ कोटी
-कमलाभवानी कारखाना: ९.० कोटी
-ओंकार कारखाना (तडवळ): ७.२६ कोटी
-आवताडे शुगर्स: ३.५९ कोटी
-मातोश्री कारखाना: १.१५ कोटी
-जयहिंद कारखाना: ०.४० कोटी
---पूर्ण---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.