PNE26W44013
सोलापूर : अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर हे रे-नगरात नागरी सुविधांसंदर्भात माजी आमदार नरसय्या आडम यांच्याशी चर्चा करताना.
...........
रे-नगरच्या बीजभांडवलासाठी २५० कोटींची शिफारस
गोदूताई नगरातील पायाभूत सुविधांसाठीही निधी देण्याची खोतकरांची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २१ : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशातील महत्त्वाकांक्षी व पथदर्शी गृहप्रकल्प म्हणून साकारलेल्या रे-नगरच्या प्रलंबित बीजभांडवलासाठी २५० कोटी रुपयांची तरतूद करण्याची शिफारस राज्य शासनाकडे करण्यात येईल. तसेच कॉ. गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार वसाहतीतील मलनिःसारण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, स्मशानभूमी आणि विमा रुग्णालयासह आवश्यक नागरी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी ठोस शिफारस केली जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली.
सोलापूर दौऱ्यात गोदूताई नगर व रे-नगरची पाहणी केल्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच राज्य शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खोतकर यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.
रे-नगर प्रकल्पातील लाभार्थींच्या हिश्श्यापोटी राष्ट्रीयीकृत बँकांकडून उपलब्ध होणारे गृहकर्ज सध्या मंजूर होत नसल्याने प्रकल्पाच्या पुढील कामांवर परिणाम झाला आहे. निर्धारित कालावधीत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाने बीजभांडवलापोटी २५० कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत, तसेच पायाभूत व नागरी सुविधांसाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
गोदूताई परुळेकर नगरमध्ये सुमारे १० हजार विडी कामगार कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र, येथे अद्याप मलनिःसारण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, मुख्य व अंतर्गत रस्ते, स्वतंत्र स्मशानभूमी तसेच विमा/ईएसआय दवाखान्यासारख्या अत्यावश्यक सुविधांचा प्रश्न प्रलंबित आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार सुमारे २०० कोटी रुपये खर्चाच्या मलनिःसारण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन योजनेला तातडीने प्रशासकीय व आर्थिक मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
या वेळी ज्येष्ठ आमदार हेमंत पाटील यांनीही वसाहतीत येताना अंतर्गत रस्त्यांची पाहणी केली.
या वेळी कॉ. गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षा सुनंदा बल्ला, फातिमा बेग, रे-नगर फेडरेशनच्या अध्यक्षा नलिनी कलबुर्गी, सचिव युसूफ शेख, ॲड. अनिल वासम, गजेंद्र दंडी आदींसह संस्था पदाधिकारी व पूर्णवेळ कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.