PNE26W45429
सोलापूर : विडी कामगारांशी संवाद साधताना आमदार विजयकुमार देशमुख.
विडी उद्योग परराज्यात जाऊ देणार नाही!
आमदार विजयकुमार देशमुख यांची ग्वाही; मुख्यमंत्री, कामगार मंत्र्यांकडे बैठकीसाठी पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २८ : सोलापुरातील विडी उद्योग आणि त्यावर अवलंबून असलेल्या ३० ते ४० हजार कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. महाराष्ट्रातील विडी कामगारांचे किमान वेतन इतर राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याने काही विडी उद्योगांनी उत्पादन प्रक्रिया परराज्यात हलविण्याचा विचार सुरू केला आहे. नव्या किमान वेतन दराची अंमलबजावणी झाल्यास कारखाने बंद करून परराज्यात जाण्याचे संकेत काही कारखानदारांनी दिल्याने कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ‘सोलापूरचा विडी उद्योग परराज्यात जाऊ देणार नाही,’ अशी ग्वाही आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली.
आमदार देशमुख यांनी सोलापुरातील विविध विडी कारखान्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन कामगारांशी संवाद साधला. उद्योगासमोरील अडचणी, किमान वेतनाचा प्रश्न तसेच रोजगारावर होणारा संभाव्य परिणाम याबाबत त्यांनी माहिती घेतली. विडी उद्योग टिकला तरच हजारो कामगारांचा रोजगार सुरक्षित राहणार असल्याने हा प्रश्न संवेदनशीलतेने आणि तातडीने सोडविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या कार्यालयीन ई-मेलवर पत्र पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. तसेच कामगार मंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कामगार विभाग, उद्योग विभाग, विडी उद्योग प्रतिनिधी आणि कामगार संघटनांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी केली.
महाराष्ट्रातील विडी उद्योग परराज्यात स्थलांतरित होऊ नये आणि कामगारांचा रोजगार अबाधित राहावा, यासाठी व्यवहार्य व तातडीचे धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे. किमान वेतनाचा प्रश्न सोडविताना कामगारांचे हित आणि उद्योगाचे अस्तित्व या दोन्ही बाबींचा समतोल साधला जावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
चौकट...
कामगार मंत्र्यांचे आश्वासन
कामगार मंत्री फुंडकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून संबंधितांची तातडीने बैठक आयोजित केली जाईल आणि या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.