कुंपण ओलांडताना
मुलगा जखमी
सोलापूर ः घराचे कुंपण ओलांडताना हातात तार घुसल्याने ११ वर्षीय मुलगा जखमी झाला. शनिवारी (ता. १४) सकाळी पावणेदहाच्या सुमारास वालचंद महाविद्यालय परिसरात ही घटना घडली. साईनाथ संतोष नल्ला (रा. वालचंद महाविद्यालय, अशोक चौक) असे त्याचे नाव आहे. घराला तारेचे कुंपण आहे. ते ओलांडताना तार संतोष याच्या उजव्या हातात घुसल्याने तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. याची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.
वडकबाळमध्ये पाचजणांची
शेतकऱ्यास मारहाण
सोलापूर ः कोकरू शेतात घुसल्याच्या कारणावरून चार ते पाचजणांनी भावकीतील शेतकऱ्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शुक्रवारी (ता.१३) दुपारी चारच्या सुमारास वडकबाळ (ता. दक्षिण सोलापूर) येथे ही घटना घडली. रामचंद्र खिरप्पा गडेराव (वय ६२, रा. वडकबाळ) असे त्याचे नाव आहे. कोकरू शेतात घुसल्याच्या कारणावरून निंगप्पा गडेराव, अनिता गडेराव यांच्यासह चार ते पाचजणांनी रामचंद्र यांना मारहाण केली. त्यात मुकामार लागल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. याची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.
ओंकार शुगर्सच्या आवारात
वाहनचालकास मारहाण
सोलापूर ः ऊस वाहतुकीची गाडी लावण्याच्या कारणावरून चौघांनी सळई व लाथाबुक्क्यांनी वाहनचालकास मारहाण केली. त्यात तो जखमी झाला. शुक्रवारी (ता. १३) रात्री साडेनऊच्या सुमारास तडवळ (ता. अक्कलकोट) येथील ओंकार शुगर्सच्या आवारात ही घटना घडली. सिद्धप्पा यल्लप्पा शिरगुरे (वय २६, रा. खानापूर, ता. अक्कलकोट) असे जखमीचे नाव आहे. ऊस वाहतुकीच्या गाडीचा क्रम लावण्यावरून विठ्ठल बिराजदार, गुरुनाथ बिराजदार यांच्यासह चौघांनी सळई व लाथाबुक्क्यांनी सिद्धप्पा यास मारहाण केली. त्यात डोक्यास मार लागल्याने आणि कानातून रक्तस्त्राव झाल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. याची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.
गाडीचा फोटो काढल्याने
तरुणास मारहाण
सोलापूर ः गाडीचा फोटो काढल्याने आठ ते नऊजणांनी तरुणास मारहाण करत ढकलून दिले. त्याच्या पायावरून ट्रक गेल्याने तो जखमी झाला. शुक्रवारी (ता. १३) रात्री सव्वानऊच्या सुमारास मैंदर्गी नाक्यावर (ता. अक्कलकोट) ही घटना घडली. दत्तात्रय पुजारी (वय २५, रा. मैंदर्गी) असे त्याचे नाव आहे. नाक्यावर गाडीचा फोटो काढल्याने लड्डे (पूर्ण नाव माहीत नाही) याच्यासह आठ ते नऊजणांनी दत्तात्रय यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ढकलून दिले. त्यामुळे त्याच्या डाव्या पायावरून ट्रक गेल्याने तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. याची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.
सालसेत मायलेकास
मारहाण, जखमी
सोलापूर ः पैशाच्या कारणावरून एकाने दगडाने मायलेकास मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी सातच्या सुमारास सालसे (ता. करमाळा) येथे ही घटना घडली. सुरेखा युवराज ओव्हाळ (वय ४६), प्रतीक युवराज ओव्हाळ (वय २४, रा. सालसे) अशी त्यांची नावे आहेत. पैशाच्या कारणावरून नामदेव रूपनर याने त्यांना मारहाण केली. त्यात डोक्यास मार लागून जखमी व मुकामार लागल्याने दोघांनाही येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. याची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.
कोळेगावात तिघांची
शेतकऱ्यास मारहाण
सोलापूर ः शेतातील घराजवळ पाणी सोडल्याबाबत विचारणा केल्याने तिघांनी ऊसाच्या कांडक्याने व लाथाबुक्क्यांनी शेतकऱ्यास मारहाण केली. गुरुवारी (ता. १२) सकाळी दहाच्या सुमारास कोळेगाव (ता. मोहोळ) येथे ही घटना घडली. आनंद विलास मासाळ (वय २८, रा. कोळेगाव) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या शेतातील घराजवळ पाणी सोडल्याबाबत त्यांनी विचारणा केली. त्यामुळे चिडून आदित्य आदमाने, योगेश आदमाने यांच्यासह तिघांनी त्यांना मारहाण केली. त्यात मुकामार लागल्याने त्यांच्यावर मोहोळ येथील ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी येथील शासकीय रूग्णालयात हलविले आहे. याची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.
शेतात काम करताना
शेतकऱ्यास सर्पदंश
सोलापूर ः कोर्सेगाव (ता. अक्कलकोट) येथील शेतात काम करताना शेतकऱ्याच्या पायाला सापाने दंश केला. शनिवारी (ता. १४) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. सिद्धाराम प्रभाकर बिराजदार (वय ३४, रा. कोर्सेगाव) असे त्यांचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. याची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.
टपरीवर छापा; संशयातून
तरुणास मारहाण
सोलापूर ः एका तरुणाच्या सांगण्यावरून पान टपरीवर छापा पडल्याच्या संशयातून तिघांनी सळईने व लाथाबुक्क्यांनी त्याला मारहाण केली. त्यात तो जखमी झाला. शुक्रवारी (ता. १३) रात्री साडेनऊच्या सुमारास महुद (ता. सांगोला) येथे ही घटना घडली. सुरज सलीम मुलाणी (वय २३, रा. महुद) असे जखमीचे नाव आहे. सुरज हा घराजवळ असताना मुश्ताक मुलाणी, हारूण मुलाणी व वाहीद मुलाणी या तिघांनी तुझ्या सांगण्यावरून आमच्या पान टपरीवर छापा पडल्याचा आरोप करत त्याला मारहाण केली. त्यात डोक्यास मार लागून तो जखमी झाल्याने गावातील खासगी व सांगोल्यातील ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी येथील शासकीय रूग्णालयात हलविले आहे. याची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.
शेतीपंप चालु केल्याने
महिलेस मारहाण
सोलापूर ः शेतीपंप चालू केल्याने दोघांनी लाकडाने व लाथाबुक्क्यांनी भावकीतील महिलेस मारहाण केली. शुक्रवारी (ता. १३) दुपारी तीनच्या सुमारास मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथे ही घटना घडली. भाग्यश्री दौलप्पा तिरकोटे (वय३५, रा. मैंदर्गी) असे त्यांचे नाव आहे. शेतीपंप चालु केल्याने सिद्धाराम तिरकोटे, बसवराज माशाळे यांनी त्यांना मारहाण केली. त्यात मुकामार लागल्याने त्यांच्यावर अक्कलकोट येथील ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी येथील शासकीय रूग्णालयात हलविले आहे. याची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.