६.२२ लाख मतदार संशयाच्या यादीत
३१ ऑगस्टला प्रारूप यादी प्रसिद्ध; १.७० लाख मृत, १.३४ लाख बेपत्ता तर २.१० लाख स्थलांतरित मतदार
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २ ः विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेत सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांमध्ये मृत, आधीच नोंद असलेले, बेपत्ता व कायमस्वरूपी स्थलांतरित (एएसडीडी) असे ६ लाख २२ हजार ६७१ मतदार आढळून आले आहेत. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, आता दावे व हरकती दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १ लाख ७० हजार ६९६ मृत, १ लाख ५ हजार ९४१ आधीच नोंद असलेले, १ लाख ३४ हजार ३०२ बेपत्ता तर २ लाख १० हजार ३९१ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांचा समावेश आहे. याशिवाय १ हजार ४०३ मतदार इतर कारणांच्या वर्गवारीत आहेत.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक १ लाख ३ हजार ४५९ मतदारांचे नाव मॅपिंग नसणे अथवा विसंगतीच्या वर्गवारीत आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात ६४ हजार ५३०, अक्कलकोटमध्ये ५४ हजार २६७, पंढरपूरमध्ये ४१ हजार ८६१, माळशिरसमध्ये ३९ हजार ७७५, करमाळ्यात ३९ हजार ३६९, बार्शीत ३६ हजार ४४२, मोहोळमध्ये ३७ हजार ५६३, माढ्यात ३२ हजार ६५९, सोलापूर शहर उत्तरमध्ये ३६ हजार ९२२ आणि सांगोल्यात २२ हजार २२० मतदारांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात ५०.९० लाख मतदारांची पडताळणी
३१ ऑगस्टच्या प्रारूप यादीच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील एकूण ५० लाख ९ हजार ६७ मतदारांच्या नोंदींमध्ये मॅपिंग नसणे अथवा विसंगती असल्याचे आकडेवारीत दिसते. त्यापैकी १ लाख ९३ हजार ४५० मतदारांचे मॅपिंग झालेले नाही, तर ३ लाख १५ हजार ६१७ मतदारांच्या नोंदींमध्ये विसंगती आढळली आहे.
दावे-हरकतींसाठी महिनाभराची संधी
एसआयआरच्या सुधारित वेळापत्रकानुसार ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर नोटीस कालावधी आणि दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया २९ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे.
१७ नवीन केंद्र तर ३९ केंद्रांच्या नावात बदल
जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरण व पुनर्रचनेत बदल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या ३७२३ मतदान केंद्रे असून, पुनर्रचनेनंतर १७ नव्या मतदान केंद्रांची भर पडून एकूण ३७४० केंद्रे होणार आहेत. तसेच ३९ मतदान केंद्रांच्या नावात बदल तर २७ मतदान केंद्रांच्या ठिकाणात बदल करण्यात येणार आहे. मतदारसंघनिहाय पाहता सांगोला येथे सर्वाधिक सहा नव्या मतदान केंद्रांची भर पडणार आहे. माढा, बार्शी व सोलापूर शहर उत्तर येथे नवीन केंद्रांची भर पडणार नाही. अक्कलकोट व सोलापूर दक्षिण येथे प्रत्येकी तीन, मोहोळ व माळशिरस येथे प्रत्येकी दोन, तर माढा येथे एक नवीन केंद्र प्रस्तावित आहे. केंद्रांच्या नावातील बदल सर्वाधिक सोलापूर दक्षिणमध्ये ११, सांगोल्यात नऊ, माळशिरसमध्ये आठ आणि करमाळ्यात सात आहेत. केंद्रांचे ठिकाण बदलण्याचे प्रस्तावही करण्यात आले आहेत. अंतिम यादीपूर्वी या बदलांबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
ASDD मतदार म्हणजे कोण?
मृत मतदार : १,७०,६९६
आधीच नोंद असलेले : १,०५,९४१
बेपत्ता : १,३४,३०२
कायमस्वरूपी स्थलांतरित : २,१०,३९१
इतर : १,४०३
एकूण : ६,२२,७३३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.