सोलापुरात दररोज २ कोटी १० लाख लिटर पाणी कपात!
१६ ऑक्टोबरपासून १० टक्के कपातीची अंमलबाजवणी; २१० एमएलडीचा पुरवठा १८९ एमएलडीवर येणार
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ५ : राज्याच्या पाणी उपलब्धतेचा आढावा घेत १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपातीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सोलापूर शहराच्या रोजच्या पाणीपुरवठ्यात तब्बल २ कोटी १० लाख लिटरची कपात होणार आहे. सध्या शहराला दररोज २१० एमएलडी पाणी मिळते. त्यात १० टक्के कपात झाल्यास हा पुरवठा १८९ एमएलडीवर येणार आहे.
पाणी उपलब्धता कमी होत असताना शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील २७ टक्के गळती रोखण्याचे आव्हानही महापालिकेसमोर आहे. त्यामुळे २ कोटी १० लाख लिटरची दररोजची कपात आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात होणारी गळती, अशा दुहेरी आव्हानाला महापालिकेला सामोरे जावे लागणार आहे.
मुख्य जलवाहिन्या, वितरण व्यवस्था तसेच झोपडपट्टी परिसर आणि विडी घरकुल भागात पाणीगळतीचे प्रमाण अधिक आहे. गळती शोधून ती तातडीने दुरुस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कपातीच्या अंमलबजावणीसोबत गळती रोखण्याची कार्यवाही किती प्रभावी होते, याकडे लक्ष लागले आहे.
चौकट...
केवळ ५ एमएलडी सांडपाण्याचा पुनर्वापर
शहरातील तीन सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची एकूण क्षमता १२५ एमएलडी आहे. मात्र, प्रत्यक्षात सुमारे ८० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यातील केवळ ५ एमएलडी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर सध्या होत आहे. पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर वाढविण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. बागा, बांधकामे, वाहनांची धुलाई यांसारख्या कामांसाठी पिण्याच्या पाण्याऐवजी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चौकट...
२७ टक्के पाणी ‘गळती’त
सोलापूरच्या पाणीपुरवठ्यात तब्बल २७ टक्के पाणी गळतीत वाया जाते. आता १६ ऑक्टोबरपासून शहराला दररोज २ कोटी १० लाख लिटर पाणी कमी मिळणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी वाचविण्याबरोबरच गळतीचा प्रत्येक थेंब रोखणे महापालिकेसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. ‘कपात १० टक्के; गळती २७ टक्के’, या स्थितीत गळती नियंत्रणाची मोहीम किती प्रभावी ठरते, हे यावर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे अवलंबून असणार आहे.
चौकट :
सोलापुरच्या पाण्याचे गणित
२१० एमएलडी : सध्याचा दररोजचा पुरवठा
२१ एमएलडी : १० टक्के कपात
२ कोटी १० लाख लिटर : दररोजची कपात
१८९ एमएलडी : कपातीनंतर संभाव्य पुरवठा
२७ टक्के : पाणीपुरवठा व्यवस्थेतील गळती
चौकट
सांडपाण्याचे गणित
१२५ एमएलडी : एसटीपीची क्षमता
८० एमएलडी : प्रत्यक्ष प्रक्रिया
५ एमएलडी : सध्या पुनर्वापर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.