पत्नीची आत्महत्या, पोलिस पतीवर गुन्हा
मेव्हणीची फिर्याद; पतीच्या छळामुळेच बहिणीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १९ : पत्नीच्या आत्महत्या प्रकरणात सोलापूर तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार वैभव श्रीधर सुर्यवंशी (रा. हराळी, ता. लोहारा, धाराशिव) याच्याविरूद्ध जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मयत आकांक्षा सूर्यवंशी यांची बहीण पियुशा व्यंकटराव मुदगले (रा. कोथरूड, पुणे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. यावरून वैभवला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे.
सोलापूर शहरातील अशोक चौक परिसरात पोलिस अंमलदार वैभव सुर्यवंशी व पत्नी आकांक्षा हे त्यांच्या आठ वर्षाच्या चिमुकलीसह राहायला होते. वैभव हा मूळचा लोहारा तालुक्यातील हराळी गावचा रहिवासी, पण तो सोलापूर ग्रामीण पोलिस दलात भरती झाला होता. सध्या तो सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. दरम्यान, त्याच्या पत्नीने रविवारी (ता. १६) सकाळी दहाच्या सुमारास आत्महत्या केली. आकांक्षाच्या नातेवाईकांना ही बाब समजल्यावर दुपारी दीडच्या सुमारास ते सोलापुरात आले आणि त्यांनी जेलरोड पोलिसांत धाव घेतली होती. १८ ऑगस्टला मयताच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस अंमलदार वैभवविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ‘तुझे शिक्षण कमी आहे, तुला रुपया कमवायाची अक्कल नाही, तु मला कधी फोन करत जाऊ नकोस, तुझ्यामुळे मी प्रत्येक गोष्टीत हरत चाललो आहे. मला यश येत नाही, मला तुझे तोंड बघू वाटत नाही, तुझ्या पप्पांची निलंग्यातील जागा विकून माझ्यावरील कर्ज फेडायला पैसे आण’ असे म्हणून पती त्रास देत असल्याचे ती आम्हाला सांगत होती, असेही फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक शिवम येडे करीत आहेत.
-----------------
चौकट
१५ ऑगस्टला बहिणीला फोन केला अन्...
पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळलेल्या आकांक्षाने १५ ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास बहिणीला कॉल केला. त्यावेळी आकांक्षा म्हणाली, ‘तुझे भावजी मला वारंवार तु एक रूपया कमवत नाहीस म्हणून खूप त्रास देतात. मला जगू वाटत नाही, मी या त्रासाला कंटाळून माझ्या जिवाचे काहीतरी बरवाईट करून घेईन’. त्यावेळी फिर्यादी बहिणीने आकांक्षाला समजावून सांगितले आणि आईला कॉन्फरन्स कॉल करूनही तिला समजावले होते. पण, तिने १६ ऑगस्टला आत्महत्या केल्याचे घर मालकीणीने सांगितले, असेही फिर्यादीत नमूद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.