द्राक्ष बागायतदारांच्या प्रलंबित
प्रश्नांवर तोडगा काढणार
कृषिमंत्री भरणे ः द्राक्ष बागायतदार संघाच्या ६६ व्या वार्षिक अधिवेशनाची सांगता
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : ‘‘द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न व अडचणी आहेत. द्राक्ष बागायतदार संघाने त्या माझ्याकडे मांडल्या आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत विशेष बैठक आयोजित करण्यात येईल. द्राक्ष बागायतदार संघाचे प्रतिनिधी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांची मुंबईत संयुक्त बैठक घेऊन प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढला जाईल,’’ असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
१९६० मध्ये ६० सभासदांपासून सुरू झालेल्या या संघाशी आज ३३ हजारांहून अधिक शेतकरी जोडले गेले आहेत. कोरोनासारख्या संकटातही द्राक्ष बागायतदारांनी मोठ्या धैर्याने काम केले आहे, असे भरणे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या ६६ व्या वार्षिक अधिवेशनाची सांगता बुधवारी (ता. २६) मांजरी फार्मजवळील लक्ष्मी लॉन्स येथे कृषिमंत्री भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, उपाध्यक्ष मारुती चव्हाण, अखिल भारतीय द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष सोपान कांचन, खजिनदार डॉ. चनगोंडा हविनाळे, मध्यवर्ती संशोधन समितीचे अध्यक्ष अभिषेक कांचन, माजी अध्यक्ष महेंद्र शाहीर, डी. बी. मोगल, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे माजी संचालक डॉ. एस. डी. सावंत, संघाचे विभागीय अध्यक्ष सुरेश कडलग (पुणे), दत्तात्रय पाटील (सांगली), राजेंद्र देशमुख (सोलापूर), बाळासाहेब गडाख (नाशिक), अनिल मेहेर यांच्यासह संघाचे पदाधिकारी, द्राक्ष उत्पादक आणि मान्यवर उपस्थित होते.
द्राक्ष शेतीला हवामान बदलाचा फटका बसत आहे; मात्र त्याचा सामना करावा लागेल. आगामी काळातील हवामान बदलाचे धोके गृहीत धरून त्यानुसार वाणांमध्ये बदल करावा लागेल. गुणवत्ता व उत्पादनवाढीसाठी संघाने पुढाकार घ्यावा. तसेच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी अधिवेशनातील तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेऊन पिकाची गुणवत्ता व उत्पादन वाढवून योग्य दर मिळवावा, असे आवाहन भरणे यांनी केले.
प्रास्ताविकात अध्यक्ष भोसले यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यवहारात होणारी फसवणूक थांबविण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याचे आश्वासन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. आता कृषिमंत्र्यांनी ही जबाबदारी घ्यावी, अशी मागणी केली. यांसह द्राक्ष पीकविमा आणि शेतकऱ्यांची व्यवहारातील फसवणूक या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले. तसेच बेदाणा मंडळाची स्थापना, चीनमधून होणारी बेदाण्याची आयात रोखावी आणि बेदाणा उत्पादकांसाठी कर्नाटक सरकारच्या सहकार्याने सर्वंकष धोरण राबवावे, अशा मागण्या करण्यात आल्या.
आधुनिक तंत्रज्ञान, निर्यात व हवामान बदलावर मंथन
द्राक्ष बागेतील जमिनीचे आरोग्य, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, समुद्री शेवाळाचा वापर, निर्यातवाढ आणि आधुनिक तंत्रज्ञान यावर द्राक्ष अधिवेशनात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. हरिहर कौसडीकर व पियरे फिलिप यांनी जमीन व अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत, तर राजाराम सांगळे यांनी द्राक्ष निर्यातीतील समस्या व उपाययोजनांवर माहिती दिली. डॉ. शरदचंद्र लोहकरे यांनी ईव्ही ट्रॅक्टरच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञ कोबस बोथमा यांनी क्षारता, क्षारयुक्त जमिनीची सुधारणा, पोषण व दुष्काळी परिस्थितीतील सिंचन व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. गणेश मोरे, पंकज नाठे यांनी द्राक्ष वाणांसंबंधी मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.