सोयाबीन सलाईनवर, कपाशीची वाढ खुंटली
पश्चिम विदर्भात पावसाची प्रतीक्षा, उत्पादन घटण्याची धास्ती
अॅग्रोवन वृत्तसेवा
अकोला : गेल्या आठवड्यापासून दररोज आभाळ भरून येते. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागतात. मात्र, साचलेले ढग वाऱ्याच्या झोतासोबत विरळ होतात आणि पुन्हा उन्हाची तीव्रता जाणवते. दररोज पावसाचे वातावरण तयार होते; पण पाऊस मात्र हुलकावणी देत आहे. उगवणारा प्रत्येक दिवस शेतकऱ्यांसाठी पावसाच्या आशेवरच जात आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यांत गेल्या महिनाभरापासून दमदार पाऊस नसल्याने खरीप पिकांची अवस्था बिकट होत चालली आहे.
तिन्ही जिल्ह्यांत सोयाबीनची सुमारे ९ लाख हेक्टरपेक्षा अधिक पेरणी झाली आहे. सुरुवातीच्या काळात पावसाने साथ दिल्याने पिकांची स्थिती चांगली होती. काही भागांत वाढही समाधानकारक झाली. मात्र, आता सोयाबीन फुलोऱ्यात असून, याच संवेदनशील टप्प्यावर पावसाचा खंड पडला आहे. पाण्याअभावी फुले गळत असून, झाडांवरील काही शेंगा अर्धवट परिपक्व होऊ लागल्या आहेत. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने हलक्या जमिनीवरील पिकांना पाण्याचा ताण अधिक जाणवत आहे. काही ठिकाणी पाने वाळण्यास सुरुवात झाली असून, अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली आहे.
अकोल्यातील चार तालुक्यांत चिंता
अकोला जिल्ह्यात बाळापूर, पातूर, अकोला आणि बार्शीटाकळी तालुक्यांत सरासरीच्या ६० टक्केही पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात ५६१ मिलिमीटर सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ३७३ मिलिमीटर म्हणजे ६६.५ टक्के पाऊस झाला आहे. बुलडाण्यात ५२५ मिलिमीटर सरासरीच्या तुलनेत ४३६ मिलिमीटर म्हणजे ८३.० टक्के, तर वाशीममध्ये ६३० मिलिमीटरच्या तुलनेत ४३८ मिलिमीटर म्हणजे ६९.५ टक्के पाऊस झाला आहे.
पेरणी मोठी; पिकांना पाण्याची गरज
बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३ लाख ९७ हजार ४२ हेक्टर असून, यंदा ४ लाख ५१ हजार ८५० हेक्टरवर म्हणजे ११४ टक्के पेरणी झाली आहे. अकोल्यात सरासरी २ लाख ३६ हजार ४५९ हेक्टरच्या तुलनेत १ लाख ८७ हजार २२७ हेक्टरवर म्हणजे ७९ टक्के, तर वाशीममध्ये सरासरी २ लाख ९८ हजार ९४७ हेक्टरच्या तुलनेत २ लाख ७१ हजार २५२ हेक्टरवर म्हणजे ८४ टक्के पेरणी झाली आहे.
या वर्षी कपाशी लागवडीकडे कल राहिल्याने पेरणी क्षेत्र वाढले. अकोल्यात सरासरी १ लाख २८ हजार ५९३ हेक्टरच्या तुलनेत १ लाख ६० हजार ७१४ हेक्टरवर म्हणजे १२५ टक्के लागवड झाली. वाशीममध्ये २६ हजार ४३८ हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ३७ हजार ६८१ हेक्टरवर म्हणजे १४३ टक्के लागवड झाली आहे. मात्र, पावसाच्या खंडामुळे कपाशीची वाढ खुंटली आहे. वास्तविक, सध्याचा हा काळ कपाशी पिकासाठीही महत्त्वाचा राहतो. या काळात फुलोरावस्था राहते.
तुरीचेही मोठे क्षेत्र असून, बुलडाण्यात १ लाख हेक्टरपेक्षा अधिक, अकोल्यात ५७ हजार ६७९ आणि वाशीममध्ये सुमारे ६० हजार हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे.
‘२५ ते २६ दिवसांपासून पावसाची उघडीप’
बुलडाणा जिल्ह्यात जवळपास २५ ते २६ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या स्थितीत जैविक निविष्ठा, जसे जिवामृत, दशपर्णी अर्काचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांनी सूक्ष्म सिंचनाचा वापर करून संरक्षित ओलीत द्यावे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी सांगितले.
संवेदनशील अवस्थेत सोयाबीन, कपाशी
अकोला जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन व कपाशी फुलोरा आणि बोंडे/शेंगा धरण्याच्या अत्यंत संवेदनशील टप्प्यावर पाण्याच्या तीव्र ताणाचा सामना करत आहेत. जमिनीतील ओलावा वेगाने कमी झाल्याने वेळेवर पाऊस न झाल्यास उत्पादकतेत घट होण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाण्याचा वापर तुषार किंवा ठिबक सिंचनाद्वारे संरक्षित पाणी देण्यासाठी करावा. बाष्पीभवन रोखण्यासाठी शिफारशीत फवारणी व आच्छादनाचा वापर करावा, असा सल्ला प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी दिला आहे.
कपाशीवर रसशोषक किडींचाही प्रादुर्भाव
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कापूस पीक शास्त्रज्ञ डॉ. सुरेंद्र देशमुख यांनी सांगितले की, साधारण एक महिन्यापासून पावसाने बऱ्याच भागांत उघडीप दिल्याने कपाशीची वाढ खुंटली आहे. आणखी काही दिवस पाऊस न आल्यास उत्पादनात निश्चितच घट संभवते. बऱ्याच ठिकाणी रसशोषण करणाऱ्या किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी कोळपणी करावी, तसेच पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी डवऱ्याला दोरी बांधून सऱ्या काढाव्यात, असा सल्ला त्यांनी दिला. शक्य असल्यास संरक्षित ओलीत करावे आणि महागड्या कीटकनाशकांचा वापर टाळून निंबोळी अर्काची फवारणी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोट
माळरानावरील सोयाबीनचे आताच ७० टक्के नुकसान झाले आहे. खोलगट भागातील शेतात भेगा पडल्या असून, झाडांच्या मुळ्या तुटत आहेत. तेथेही आताच ३० टक्के नुकसान झाले आहे. एक-दोन दिवसांत पाऊस आला नाही तर १०० टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे.
- निंबाजी लखाडे, शेतकरी, खुदनापूर, जि. बुलडाणा
कोट
सध्या अत्यंत भीषण स्थिती तयार झाली आहे. या आठवड्यात पाऊस न झाल्यास सोयाबीनची फुले, शेंगा पूर्णपणे गळून पडू शकतात. सध्याच झाडे सुकत आहेत. बहुतांश शेती कोरडवाहू असल्याने सिंचनाची सोय नसलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येक दिवस जड जात आहे.
- उमेश बिडकर, कुंभारी, जि. अकोला
कोट
सोयाबीन पिकावर डोणगाव (ता. मेहकर) भागात अजून चार ते पाच दिवस पाऊस पडला नाही तर ४० ते ५० टक्के उत्पादन घटू शकते. फळबागांमध्ये तर सध्याच ५० टक्के उत्पादनात घट होणार हे स्पष्ट झाले आहे. कारण उष्णता वाढल्याने संत्रा बागेत गळ होत आहे. ही परिस्थिती आगामी रब्बीच्या दृष्टीनेही चांगली नाही.
- प्रीतेश डहाडे, शेतकरी, डोणगाव, जि. बुलडाणा
कोट
सोयाबीन पिकाची अतिरिक्त वाढ झाल्याने फुलांचे प्रमाण खूप कमी आहे. या फुलोरावस्थेत पावसाने उघडीप दिल्याने फुलगळ वाढली आहे. किडीचा प्रादुर्भावही वाढलेला आहे. या आठवड्यात पाऊस न झाल्यास सोयाबीन पीक पूर्णपणे हातातून जाऊ शकते. लावलेला खर्चही अनेकांना निघेल, याची शाश्वती राहिलेली नाही.
- विनोद पाटील, सुदी, जि. वाशीम
फोटो : agnakola29aug-cropdamage
ओळी : नायगाव देशमुख (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात हलक्या जमिनीतील सोयाबीन दिवसभर असे माना टाकलेले राहते. (छायाचित्र : अमोल माडोकार)
फोटो : agnakola29aug-cropdamage2
ओळी : बोरी अडगाव (ता. खामगाव, जि. बुलडाणा) येथील विठ्ठल घोंगे यांच्या शेतातील वाळत असलेले सोयाबीन पीक. (छायाचित्र : सचिन बोहरपी)
फोटो : agnakola29aug-cropdamage3
ओळी : सिंचनाची सोय असलेल्या क्षेत्रातही सध्याच्या पावसाच्या खंडामुळे व वाढलेल्या तापमानामुळे कपाशी पिकात अशी मोठ्या प्रमाणात फुल-पात्यांची गळ होत आहे. (छायाचित्र : सदानंद खारोडे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.