पान ५
शेतकरी आत्महत्यांचे सत्र
थांबविण्यासाठी उपाययोजना करा
रघुनाथदादा पाटील यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतीला पाणी देण्याची मागणी
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : राज्यातील दुष्काळाची दाहकता वाढत असून, नापिकी आणि कर्जाच्या चिंतेमुळे राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. याबाबत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. तसेच, शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबविण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
‘‘गेली १२ वर्षे तुमची सत्ता आहे. तुम्ही निर्यातबंदी उठवली का? कर्जमुक्तीच्या घोषणा करता, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना अनुदान देणार म्हणता, परंतु असे काही दिले का? व्ही. पी. सिंग व अटल बिहारी वाजपेयी यांची सत्ता असताना कै. शरद जोशींना टास्क फोर्सचे अध्यक्ष केले होते. त्या वेळी शेतकऱ्यांसाठी देशाच्या अर्थव्यवस्थेचे काय करायला पाहिजे, हे त्यांनी लेखी दिले आहे. तुम्ही ते कधी वाचण्याची तसदी घेतली आहे का?’’ असे प्रश्न पत्रात उपस्थित केले आहेत.
‘‘आता तुम्ही दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्व धरणे व तलावांतील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचे जाहीर केले आहे. शेतीचा पाणीपुरवठा बंद केला आहे. तुम्हाला जर खरेच महाराष्ट्रातील जनतेची काळजी असती, तर कोयनेची वीजनिर्मिती बंद करून समुद्राला जाणारे पाणी बंद करायला पाहिजे होते. वीज निर्मिती ही सोलार, पवन ऊर्जा, कोळसा यापासूनही होत आहे. हे समुद्राला जाऊन मिळणारे पाणी आज शेतीसाठी वापरले तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या प्रांतांनाही फायदा होणार आहे,’’ असेही पत्रात म्हटले आहे.
जागतिक तापमानवाढीने संपूर्ण युरोप होरपळला आहे. येत्या उन्हाळ्यात विदर्भातील नागपूर, वर्धा इत्यादी शहरांतील लोकांना स्थलांतरित करावे लागेल. जगाला वाचविण्याची क्षमता भारतीय शेतीत आहे. त्यामुळे शेती वाचविणे गरजेचे आहे. यासाठी शक्तिपीठासारखे महाकाय रस्ते, वाढवणसारखी बंदरे यासाठी समुद्रात भर घालणे, वृक्षतोड करणे हे थांबवले पाहिजे. हा सर्व पैसा शेतकरी कर्जमाफीसाठी, शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी खर्च झाला पाहिजे. तरच महाराष्ट्रातील जनता या दुष्काळात वाचेल, असेही पत्रात म्हटले आहे.
चौकट
‘यापूर्वीच्या पत्रांना
मुख्यमंत्र्यांकडून प्रतिसाद नाही’
‘‘आपणांस पत्र लिहावे असे अजिबात वाटत नाही. कारण यापूर्वी लिहिलेल्या पत्रांना आपणाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. आपण मुख्यमंत्री असताना शेतकरी आत्महत्यांचे सत्र वाढत आहे. तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्यांनी मन अस्वस्थ झाले. कै. शरद जोशींच्या नेतृत्वाखाली ४० वर्षे शेतकरी चळवळीत काम केल्यानंतर जर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नशिबी फाशीचा दोर किंवा विषाची बाटली येत असेल, तर तुमचे सरकारच दोषी आहे,’’ असेही रघुनाथदादा पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.