बारामती, ता. २२ : गळीत हंगामात ऊस वाहतुकीदरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी तसेच वाहतुकीवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वतीने गुरुवारी (ता. २२) विशेष बैठक आयोजित केली होती.
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेसह वाहतुकीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने या बैठकीत दिल्या गेल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे, अनिल शेलार यांच्यासह बारामती कार्यक्षेत्रातील विविध साखर कारखान्यांचे शेती अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची सर्व वैध कागदपत्रे सोबत ठेवावीत, क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरू नये, वाहनाच्या मागील बाजूस लाल रंगाची रिफ्लेक्टिव्ह टेप लावावी तसेच ट्रॅक्टरचा वेग मर्यादित ठेवून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या. रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करताना विशेष खबरदारी घ्यावी. मद्यप्राशन करून वाहन चालवू नये आणि वाहनांमध्ये मोठ्या आवाजात स्पीकर लावू नयेत, अशा सूचना दिल्या गेल्या.
या बैठकीस दौंड शुगर, भीमा शुगर, कर्मयोगी शुगर, बारामती ॲग्रो, सोमेश्वर, माळेगाव आणि छत्रपती साखर कारखान्यांचे शेती अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
ऊस वाहतुकीसाठी असे आहेत नियम
- वाहनचालकांनी वाहनाची कागदपत्रे सोबत ठेवावीत
- ट्रॉलीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरू नये
- वाहनाच्या मागील बाजूस रिफ्लेक्टिव्ह पट्टी लावावी
- वेग मर्यादेचे पालन करावे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे टाळावे.
- रात्री विशेष काळजी घेऊन वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे.
साखर कारखान्यांच्या प्रवेशद्वारावर वाहनांची तपासणी करून सुरक्षा नियमांचे पालन होत असल्याची खात्री करावी. तसेच वाहनचालकांसाठी रस्ता सुरक्षा आणि अपघात प्रतिबंधक उपाययोजनांबाबत प्रबोधनात्मक शिबिरे आयोजित करावीत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकामार्फत कारवाई करण्यात येणार आहे.
- सुरेंद्र निकम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.