सोमेश्वरनगर/माळेगाव, ता. १३ : बारामती तालुक्यातील सोमेश्वर व माळेगाव या दोन कारखान्यांकडून शेतकऱ्यांना मिळणारी ऊसबिले यावर्षी तब्बल आठशे पंच्याऐंशी कोटींवर पोहोचली आहेत! यातून दिवाळीच्या तोंडावर ७५ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार असून त्यामुळे बाजारपेठांनाही मोठा आधार मिळणार आहे. चालू हंगामात उसदराबाबत ‘माळेगाव‘च्या तुलनेत ‘सोमेश्वर’ने बाजी मारली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर आणि माळेगाव या सख्ख्या शेजाऱ्यांमध्ये गाळप, उतारा, ऊसदर याची निकोप स्पर्धा असते. शेतकऱ्यांचीही शेजाऱ्यांमध्ये स्पर्धा राहावी आणि काटेकोर कारभार करून दर मिळावेत अशी इच्छा असते. याशिवाय बारामती, पुरंदर, फलटण, खंडाळा तालुक्याच्या बाजारपेठांचेही दिवाळीच्या तोंडावर या कारखान्यांच्या अंतिम बिलाकडे लक्ष असते. आताच्या दिवाळीला सोमेश्वरकडून ६१ कोटी तर माळेगावकडून सुमारे १४ कोटींची अंतिम बिले मिळणार आहेत. कामगारांनाही चांगले बोनस मिळणार आहेत.
माळेगाव कारखान्याने रविवारी (ता.१३) सभासदांच्या सात लाख ७५ हजार टनांस सरसकट ३६५० रुपये तर गेटकेनच्या तीन लाख १४ हजार टनांस ३४०० रुपये प्रतिटन दर जाहीर केला. तर ‘सोमेश्वर''ने सभासदांना जानेवारीअखेर ३८००, फेब्रुवारीत ३९०० तर मार्चमध्ये ४००० रुपये प्रतिटन दर नुकताच जाहीर केला आहे. सोमेश्वरची १२ लाख ९८ हजार गाळपाच्या दराची सरासरी ३८५० रुपये होत आहे. यामुळे सोमेश्वरने सभासदांना प्रतिटन दीडशे ते दोनशे रुपये अधिक देऊन बाजी मारली आहे. अधिकच्या गाळपामुळे सोमेश्वरची एकूण ऊसबिले ४९५ कोटींची तर माळेगावची ३८९ कोटींची झाली आहेत.
मर्यादित कार्यक्षेत्र, मोठी डिस्टिलरी-कारखाना यामुळे माळेगाव पुढे असायचा. ‘सोमेश्वर’नेही आवश्यक ते विस्तारीकरण केले. २०१७-१८ पासून कधी माळेगाव तर कधी सोमेश्वर पुढे अशी शेतकरीहिताची स्पर्धा आहे. गेटकेनधारकांना मात्र दोन्ही कारखान्यांनी ३४०० रुपये प्रतिटन दर दिला आहे. सोमेश्वरने ९६ हजार तर माळेगावने तीन लाख टन गेटकेन आणला होता.
सोमेश्वर कारखाना (एकूण बिल ४९५ कोटी)
गाळप तपशील गाळप (टन) दर (रु.) बिलाची रक्कम
जानेवारीअखेर गाळप - ७,६६,३६० ३८०० २९१ कोटी २१ लाख
फेब्रुवारी गाळप - २,७३,५१६ ३९०० १०६ कोटी ६७ लाख
मार्चमधील गाळप - १,६२,३५३ ४००० ६४ कोटी ९४ लाख
कार्यक्षेत्रातील गाळप - १२,०२,२३० ३८४९.७५ ४६२ कोटी ८२ लाख
गेटकेन गाळप - ९६,३२८ टन ३४०० रुपये दर ३२ कोटी ७५ लाख बिल
---------------------------
माळेगाव कारखाना (एकूण बिल - ३८९ कोटी)
सभासदांचे गाळप - ७ लाख ७५ हजार टन दर - ३६५० एकूण बिल २८३ कोटी १२ लाख
गेटकेन गाळप - ३ लाख १४ हजार टन दर - ३४०० एकूण बिल १०६ कोटी ७६ लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.