मंचर, ता. २० : सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर राहून ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ऊस पुरवठ्याच्या आधारावर कारखान्याचे सभासदत्व देता येणार नाही, असे साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २२ मधील तरतुदीनुसार सहकारी साखर कारखान्याचे सभासद संबंधित कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असणे बंधनकारक आहे.
साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना याबाबत निर्देश दिले आहेत. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पात्र व्यक्तीने सभासदत्वासाठी अर्ज केल्यानंतर विहित मुदतीत त्यावर निर्णय घेणे आवश्यक आहे. पात्रता नसल्यास अर्ज कारणासहित नाकारावा. अर्ज नाकारल्यास संबंधित व्यक्तीस महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम २३ अन्वये प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे अपील करता येणार आहे.
सभासदत्वाचे अर्ज व शेअर अनामत रक्कम निर्णयाविना प्रलंबित असल्यास संबंधित कारखान्यांनी ते अर्ज तातडीने निकाली काढावेत आणि नामंजूर अर्जांची शेअर अनामत रक्कम संबंधितांना परत करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयाचा परिणाम आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर होणार आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सभासद करून घेण्यासंदर्भातील प्रस्तावाला या परिपत्रकामुळे मर्यादा आल्या आहेत. मात्र, कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना ऊस पुरवठा करण्यास या निर्देशामुळे प्रतिबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.