ऊसदर न देणाऱ्यांविरुद्ध
तीव्र आंदोलन छेडणार
मंगळवेढ्यात ऊसदर समितीच्या बैठकीत निर्णय
ॲग्रोवन वृत्तसेवा
मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा तालुक्यात ज्या साखर कारखान्यांनी निश्चित केलेला ऊसदर देण्याचे लेखी आश्वासन देऊनही शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे दर दिलेला नाही, त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय मंगळवेढा येथील ऊसदर समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच आगामी गाळप हंगामात कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्याने उसाला कोयता लावू नये, असा ठरावही बैठकीत एकमुखाने मंजूर करण्यात आला.
गतवर्षीच्या आंदोलनादरम्यान मंगळवेढा तालुक्यातील दामाजी, युटोपियन, भैरवनाथ आणि फॅबटेक या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना प्रति टन ३००० रुपये ऊसदर देण्याचे आश्वासन दिले होते. या कारखान्यांनी पूर्ण दर दिला आहे का, याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. पोळा आणि आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना प्रति टन २०० रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता तातडीने वर्ग करावा, अशी मागणी समितीने केली आहे. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर बैठकीत सखोल चर्चा झाली. पिके व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यात तातडीने सोडावे, या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
या बैठकीस ऊसदर संघर्ष समितीचे दीपक भोसले, सचिन पाटील, ॲड. राहुल घुले, निवास नागणे, श्रीमंत केदार, संगमेश केदार, बाळासाहेब बोबडे, संदीप फडतरे, पांडुरंग बाबर यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट ---
बैठकीतील प्रमुख निर्णय
- आगामी गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल जाहीर करावी.
- दर जाहीर होईपर्यंत सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून उसाला कोयता लावू नये.
- पोळा व दिवाळीसाठी प्रति टन २०० चा दुसरा हप्ता कारखान्यांनी त्वरित द्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.