सोमेश्वरनगर, ता. २७ : साखरेच्या दरावर आलेली कृत्रिम सूज एकाच आठवड्यात ओसरली आहे. ६४०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचलेले दर सुमारे १५०० रुपयांनी घसरले आहेत. कारखान्यांना गुरुवारी (ता. २७) साखरेचा ४८०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल असा रास्त दर मिळाला. यामुळे साखरेचा तुटवडा नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
साखरेचे दर जुलैच्या अखेरीस आणि ऑगस्टचा पहिला आठवडा प्रतिक्विंटल ४५०० रुपयांच्या आसपास होते. ते १४ ऑगस्टला ४७०० ते ४८०० रुपयांवर पोहोचले आणि साखर बाजारातून संपल्याचे चित्र निर्माण झाल्याने सातच दिवसांत ६४०० रुपयांचा विक्रमी टप्पा गाठला. यामुळे कारखाने, शेतकरी यांच्याऐवजी साठेबाजांचेच फावण्याची शक्यता होती. मात्र राज्य व राष्ट्रीय साखरसंघांनी पुरेशी साखर शिल्लक असल्याचे स्पष्ट केले.
केंद्र सरकारने साखरसाठ्याचा आढावा घेत कठोर मर्यादा आणल्या. आयातीची घोषणा केली. शेतकरी संघटनांनीही वीस हजार कोटींचा साखरघोटाळा होणार असल्याचा हल्लाबोल केला. यातून सातच दिवसात वातावरण पूर्वपदावर आले. २६ ऑगस्टला साध्या साखरेला ५१५० ते ५२५० असे दर नोंदवले गेले. तर आज साध्या साखरेचे दर ४८०० रुपये तर मोठ्या साखरेचे दर ५००० रुपये प्रतिक्विंटलवर थांबले.
दरास स्थैर्य मिळण्याची शक्यता
देशात १ ऑक्टोबरला सुरू होणाऱ्या नव्या साखर हंगामासाठी ३० ते ३४ लाख टन शिल्लक साखरसाठा राहणार आहे. तसेच पुढील हंगामात गरजेइतकी साखरनिर्मिती होणार आहे. यामुळे साखरेच्या दराला ४५ रुपयांच्या आसपास स्थैर्य मिळण्याची शक्यता बळावली आहे.
साखरेचा तुटवडा नव्हताच. साठेबाजांनी साखरेची केलेली दरवाढ अनैसर्गिक होती असा राजू शेट्टींनी केलेला दावा खरा ठरला आहे. साखरघोटाळा थांबवण्यात आणि फुगा फोडण्यात यश आले आहे. मात्र शेतकरी आशेला लागला होता. ज्या छोट्या व्यापाऱ्यांच्या गळ्यात साखर मारली त्यांचे लाखोंचे नुकसान होणार आहे यास जबाबदार कोण?
- ॲड. योगेश पांडे, साखर उद्योगाचे अभ्यासक
आम्हाला लहान साखरेला ४८०० तर मोठ्या साखरेला ५००० रुपये दर मिळाला. साखरेचे दर अधिकतम ६४०० ते ६६०० पर्यंत गेले होते. तेव्हा साखरेस किरकोळ उठाव होता. आता योग्य पातळीला दर पोहोचले असून हे स्थिर राहतील अशी शक्यता आहे. आता साखरेस उठावही मिळेल.
- राजेंद्र यादव, कार्यकारी संचालक, सोमेश्वर साखर कारखाना
कोल्हापूर साखर दर प्रतिक्विंटलप्रमाणे (स्रोत - चिनी मंडी)
२६ ऑगस्ट....... ५१५० ते ५२५०
२४ ऑगस्ट.......५६२० ते ५६८०
२१ ऑगस्ट.......६३०० ते ६४००
१८ ऑगस्ट.......५४०० ते ५४६०
१४ ऑगस्ट.......४७२० ते ४८००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.