साखर उतारा वाढविण्यासाठी कारखाना पातळीवरील उपाययोजना
प्रतापराव चिपळूणकर
----
मागील लेखामध्ये आपण शेतकऱ्यांनी साखर उतारा वाढविण्यासाठी काय करावे, याचा विचार केला. या लेखामध्ये साखर उतारा वाढविण्यासाठी साखर कारखान्यांना कोणत्या उपाययोजना आखता येतील, यावर विचार करू.
---------------------------
भाग २
-------------------------
पूर्वी साखर कारखाने चालू होण्याअगोदर पाळीतील उसातील साखर उतारा मोजला जाई. ज्याचा उतारा ठरावीक पातळीपेक्षा खाली आहे, त्याच्या उसाला तोडणी थांबविली जाई. क्रमपाळीप्रमाणेच तोडण्या होत. आज हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच कारखानेही मजूरटंचाईने हैराण आहेत. कर्मचाऱ्याने पाळी पाहून कोणता फड तोडायचा, याची चिठ्ठी दिल्याशिवाय तोडणी केली जात नसे. आज फडकऱ्यांच्या टोळ्याच कोणाचा ऊस तोडायचा हे ठरवितात. तोडणीपूर्वी मालक तोडप्यांना किती व वाहनचालकाला किती पैसे देणार याचा सौदा केला जातो. तडजोड योग्य न झाल्यास तोडणी नाकारली जाते. असाह्य ऊस मालक गरजेपोटी तडजोड मान्य करतो. यामुळे क्रमपाळी व उतारा मोजून तोडणी हे विषय कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत.
साखर कारखाने नोव्हेंबरमध्ये सुरू होतात. नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांत सरासरी उतारा बराच खाली असतो. या दोन महिन्यांतील उतारा घटीमुळे अंतिम सरासरी उतारा कमी पडतो. यामुळे या दोन महिन्यांत लवकर होणाऱ्या जाती प्राधान्यक्रमाने गाळप करून अंतिम सरासरी साखर उतारा वाढविण्याचे प्रयत्न काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात झाले. त्या वेळी ६७१ ही लवकर पक्व होणारी जात पहिल्या दोन महिन्यांत प्राधान्याने तोडायचे धोरण ठरविण्यात आले. यातून कारखान्याचा सरासरी उतारा वाढला. प्राधान्याने तोडणी मिळते या कारणाने शेतकऱ्यांनीही ६७१ जातींची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. ६७१ ही लवकर पक्व होणारी जात. कारखान्याच्या सरासरीइतका उतारा नोव्हेंबरमध्येच देणारी व पुढे २-३ महिने उतारा वाढत जाणारी असल्याने सरासरी साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली. लवकर पक्व होणारी जात म्हणजे हळवी जात. हळव्या जातीला वाढीचा हंगाम कमी मिळत असल्याने उत्पादन कमी असते. प्राधान्याने तोडणी मिळते; परंतु उत्पादन म्हणावे तसे मिळत नसल्याचे व अर्थशास्त्र मेळ खात नसल्याचे लवकरच शेतकऱ्यांच्या लक्षात आले. कारण अपवाद वगळता कोणत्याही कारखान्याने या उसाला जास्त साखरेपोटी वाढीव दर दिला नाही. मग शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी जादा खतमात्रा देणे सुरू केले. लवकर पक्व होणाऱ्या जातीचे व उशिरा पक्व होणाऱ्या जातीच्या खताचे हप्त्यात फरक असला पाहिजे. मात्र प्रशिक्षणाअभावी उशिरा दिल्या गेलेल्या नत्रामुळे उसाच्या पानात नत्राची टक्केवारी वाढली. अशा पानांवर तांबेरा रोगाचा प्रचंड प्रादुर्भाव होऊन ही जात नष्ट झाली. यानंतर अशी गुणी जात मिळालेली नाही. आज प्रामुख्याने को ८६०३२ ही मध्यम मुदतीची जात प्रामुख्याने लावली जाते. काही नवीन जाती प्रसारित होण्याच्या मार्गावर आहेत. आज २६५ ही उशिरा पक्व होणारी जात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. तिला उशिरा उतारा येत असल्यामुळे बहुतेक पश्चिम बाजूच्या कारखान्यात फेब्रुवारीच्या आधी स्वीकारली जात नाही. पूर्व बाजूच्या कारखान्यात बहुतांशी क्षेत्र या जातीचे असल्याने पहिल्यापासून स्वीकारली जाते.
काही वर्षांपूर्वी पहिले दोन महिने लवकर पक्व होणाऱ्या जाती गाळपात प्राधान्याने गाळपाचा प्रयोग झाला. या प्रयोगात कमी साखर उतारा असणाऱ्या एका कारखान्याने आपला सरासरी साखर उतारा जास्त उतारा असणाऱ्या कारखान्याबरोबर आणून दाखविला. परंतु उसाचा दर मात्र सर्वांसाठी एकच ठरविला गेल्यामुळे साखर उतारा जास्त असणारा ऊस पिकविण्यात शेतकऱ्यांना फारसा रस राहिला नाही. कालौघात ही योजना मागे पडली.
पाऊसमान कसे राहील यावर उसाखालील क्षेत्र अवलंबून असते. २००५ मध्ये महाराष्ट्रात सर्व नद्यांना प्रचंड महापूर आले. महापूरामुळे नदीकाठचा ऊस खराब झाल्याने साखरेचे उत्पादन खूप कमी झाले. साखरेला तेजी आली; परंतु पाण्याची उपलब्धता सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वाढली. पाऊसमान कमी असणाऱ्या भागातही मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने २००६-०७ च्या हंगामासाठी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड वाढली. त्या हंगामात अनेक कारखान्यांना जून महिन्यात पाऊस सुरू झाल्यानंतरच काही लाख टन ऊस शेतात राखून गाळप थांबवावे लागले. म्हणजे एक वर्ष ऊसटंचाई, तर दुसऱ्या वर्षी प्रचंड ऊस उपलब्धता अशा विचित्र अडचणीमुळे साखर उतारा हा विषय बाजूलाच फेकला जातो.
परदेशात बहुतांश साखर कारखान्यांची स्वतःचीच मोठी ऊस शेती असते. उदा. अमेरिकेची हवाईबेटे. तिथे साखर उताऱ्यालाच प्राधान्य देणाऱ्या व्यवस्थापनावर भर दिला जातो. त्यासाठी विशेषज्ञांना पाचारण केले जाते. ‘शुगरगेन क्रॉप लॉगिंग ॲन्ड क्रॉप कंट्रोल’ या पुस्तकाचे लेखक डॉ. क्लेमंट यांनी भारतासह जगभरातील ऊस शेतीला भेट देत अभ्यास केला आहे. या पुस्तकाच्या शीर्षकातील ‘क्रॉप लॉगिंग’ हा विषय पीक पोषणासंबंधी आहे, तर ‘क्रॉप कंट्रोल’ हे खास साखर उताऱ्यासंबंधी माहिती देणारा भाग आहे. त्यांनी ३० वर्षे साखर उताऱ्यावरच काम केले आहे. त्यांच्या कामाचे मूल्यमापन खालील आकडेवारीवरून करता येईल. १) कच्ची साखर उत्पादन २ लाख टनांवरून २,८५,००० टनांवर (१९५५) व निवृत्तीपर्यंत ३,११,००० टन (१९६५)
२) उद्योगातील कर्मचारी - मुख्य व्यवस्थापकापासून चपराश्यापर्यंत एकूण कर्मचारी ४२ यांच्याकडून १११ टन साखर उत्पादन
३) साखर उत्पादन प्रतिएकर ७.२ टनांवरून (१९५१) ११ टन (१९६५)
आपल्याकडे ऊस उत्पादनाचे मूल्यमापन शेतकऱ्यांसाठी एकरी किती टन ऊस, तर कारखान्याने किती गळीत गेले व सरासरी साखर उतारा काय आला असे केले जाते. तिकडील मूल्यमापनाची पद्धत पाहू ः
१) ऊस उत्पादन टन/एकर
२) साखर उत्पादन टन/एकर
३) प्रतिदिन प्रतिएकर ऊस उत्पादन
४) प्रतिदिन प्रतिएकर साखर उत्पादन
५) एक टन साखर तयार करण्यासाठी सरासरी किती टन उसाचे गाळप करावे लागले.
अशा मूल्यमापनातून कारखान्याची कार्यक्षमता मोजली जाते.
आपल्याकडे कोल्हापूर विभागाचा साखरउतारा सर्वांत जास्त असतो. अनेक कारखान्यांचा सरासरी साखरउतारा १२ ते १२.५ पर्यंत असतो. १२.५ टक्के साखरउतारा असेल तर एक टन साखर तयार करण्यासाठी ८ ते ८.५ टन ऊस गाळला जातो. त्यांचे म्हणणे आहे, की आपण साखर उताऱ्यासाठी योग्य परिश्रम घेतले तर ६ ते ६.५४ टन ऊस गाळून एक टन साखर तयार करणे शक्य आहे. यातून असे लक्षात यावे, की आपणास या क्षेत्रात काम करण्यास खूप वाव आहे.
विकसित देशातील साखर कारखाने साखर उतार वाढविण्यासाठी काय करतात, ते पाहू.
परदेशात २ वर्षांचे उसाचे पीक घेतले जाते. उसाची तोडणीची तारीख सहा महिने अगोदर निश्चित केली जाते. या सहा महिन्यांत कार्यक्षम पानाच्या देठातील पाण्याची टक्केवारी ८२ वरून ७२ टक्क्यांवर आणणे हे उद्दिष्ट असते. दर १५ दिवसांनी टक्केवारी मोजली जाते. महिनेवार पाण्याच्या टक्केवारीच्या आलेखाची रेषा निश्चित केली जाते. रेषेखाली निरीक्षण नोंदविले गेले तर पाणी दिले जाते. रेषेपेक्षा जास्त नोंदविले तर पाणी लांबविले जाते. सहा महिन्यांत ७२ टक्के पाणी नोंद करून तोडणी केली जाते. याबाबतचे एक उदाहरण त्यांनी पुस्तकात दिले आहे ः
१) समजा उसात ८० टक्के पाणी आहे, तर शुष्क पदार्थ २० टक्के आहेत. शुष्क पदार्थांच्या ५० टक्के साखर असते. म्हणून त्या उसात १० टक्के साखर.
२) ७२ टक्के पाणी आले तर २८ टक्के शुष्क पदार्थ असतात व १४ टक्के साखरउतारा येतो.
देठातील पाण्याची टक्केवारी ७२ टक्के आणण्याला साखर उताऱ्याच्या दृष्टीने काय महत्त्व आहे हे वरील उदाहरणातून लक्षात येईल.
ऊस तोडणीच्या अगोदर योग्यवेळी पाणी दिले तर ऊस वजनदार होऊन उत्पादन वाढते अशी अनेक शेतकऱ्यांची समजूत आहे. म्हणून तोडणीअगोदर पाणी देण्याची खबरदारी घेतली जाते. अर्थात त्यानंतर योग्य वापसा येऊन तोडणी होते. ऊस तोडणीअगोदर शेवटचे पाणी केव्हा द्यावे, यावर या पुस्तकात स्वतंत्र प्रकरण आहे. त्यानुसार, तोडणीपूर्वी शेवटचे पाणी केव्हा बंद करावे याचा निर्णय स्थानिक परिस्थिती, मातीचा पोत, तापमान, आर्द्रता, जलधारण शक्ती यांचा विचार करून ठरवावा. थंड हवामान व जास्त आर्द्रता या काळात ९० दिवस व गरम हवा कमी आर्द्रता व मोठे दिनमान या काळात ५५-६० दिवसांदरम्यान ठेवल्यास उतारा चांगला मिळतो. २ ते ३ महिने पाणी बंद करून ऊस तोडण्यास इकडील कोणीही शेतकरी तयार होणार नाही. कारण त्याला दर वजनावर मिळणार आहे, साखर उताऱ्यावर नाही. परदेशात ही स्थिती नसते. त्यामुळे आपल्या परिस्थितीसाठी काही खास अशी तंत्रे विकसित करावी लागतील. शेतकऱ्यासोबतच कारखान्यांसाठी फायद्याची (विन विन) व्यवस्था उभी करावी लागेल. ती कशी उभी करता येईल, याचा विचार पुढील लेखात करू.
०००००००००००००००००००००००००००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.