PNE26W55066
खातगाव (ता. करमाळा) : येथील रणसिंग शेती फार्मजवळ उतरलेले ऊसतोड मजूर. (छायाचित्र : राजाराम माने, केत्तूर)
---
उजनी लाभक्षेत्रात ऊसतोड मजुरांचे आगमन
शेतकऱ्यांकडून राहण्याची व्यवस्था, मुकादमांकडून टोळ्यांचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
केत्तूर, ता. ४ : राज्यात १५ ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू होणार असल्याने करमाळा तालुक्याच्या उजनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची हंगामाची तयारी सुरू झाली आहे. धुळे, नांदेड, नंदुरबार, जालना, बीड, मालेगाव आदी भागांतून ऊस तोडणीसाठी येणाऱ्या मजुरांच्या टोळ्या कुटुंबीयांसह परिसरात दाखल होऊ लागल्या आहेत.
उजनी धरणाच्या लाभक्षेत्रातील करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने उसाची अपेक्षित वाढ झाली नसली, तरी उपलब्ध पाणीसाठा व सिंचनाच्या सुविधेमुळे अनेक ठिकाणी ऊसपिके जोमदार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे गाळप हंगामाकडे लक्ष लागले आहे.
मजुरांच्या टोळ्यांसोबत बैलगाड्या, ट्रॅक्टर, संसारोपयोगी साहित्य आणि लहान मुलेही दाखल होत आहेत. शेतकऱ्यांकडून मजुरांच्या राहण्याची व्यवस्था, पाणी, वीज आदी मूलभूत सुविधांची तयारी सुरू आहे. कोणत्या शेतातील ऊस प्रथम तोडायचा, मजुरांची संख्या आणि तोडणीचे नियोजन याबाबत मुकादम व शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. कारखान्यांचे नियोजन निश्चित झाल्यानंतर ऊस तोडणीला वेग येणार आहे.
ऊस उत्पादनासाठी मोठा खर्च झाल्याने यंदा समाधानकारक दर मिळावा, तसेच ऊस वेळेत तोडून कारखान्याला पाठवला जावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. ऊस शेतात अधिक काळ राहिल्यास पुढील पिकांच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने वेळेत तोडणीला महत्त्व आहे. एकूणच, गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर उजनी लाभक्षेत्रातील शेतशिवारात ऊस तोडणीची लगबग सुरू होणार आहे.
-----
वाहतूक व्यवस्थेवरही लक्ष
तोडलेला ऊस कारखान्यापर्यंत वेळेत पोचविण्यासाठी ट्रॅक्टर, ट्रक व अन्य ऊस वाहतूक वाहनांची तयारी सुरू झाली आहे. शेतातून मुख्य रस्त्यापर्यंत ऊस नेण्यासाठी रस्त्यांची स्थिती, वाहनांची उपलब्धता आणि कारखान्याचे तोडणी नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. ऊस तोडणीचा वेग आणि वाहतूक यांचा समन्वय साधल्यास गाळप हंगाम सुरळीत होण्यास मदत होणार आहे.