बारामती, ता. १ : वातावरणातील बदल व असमतोल पावसामुळे ऊस पिकावर खोडकिडा, पांढरीमाशी, हुमणी, पायरीला व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले आहे.
हुमणी नियंत्रणासाठी प्रतिएकर २ ते ४ किलो मेटारायझियम ॲनिसोप्ली जैविक बुरशीनाशक शेणखतात मिसळून जमिनीत द्यावे किंवा फिप्रोनील ०.३ टक्के जीआर ३ ते ४ किलो प्रति एकर वापरावे. खोडकिडीसाठी लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांनी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ६० मिली २०० लिटर पाण्यात मिसळून एक एकर क्षेत्रावर फवारणी करावी, तसेच एकरी ५ ते ६ कामगंध सापळे लावावेत.
पांढरीमाशीच्या नियंत्रणासाठी सुरुवातीच्या काळात एकरी १० ते १२ पिवळे चिकट सापळे लावावेत. प्रादुर्भाव वाढल्यास इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के एसएल पाच मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पायरीला किडीसाठी सिलिअम लेकोनी १.१५ या जैविक बुरशीनाशकाचा वापर करावा. तसेच क्लोरोपायरीफॉस २ टक्के ईसी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करता येईल. तांबेरा रोगासाठी मॅन्कोझेब ७५ टक्के डब्ल्यूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कृषी विभागाकडून ऊस पिकावरील किडी व रोगांची ओळख, नियंत्रण तसेच शिफारस केलेल्या कीटकनाशकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती करण्यात येत आहे.उसा