उसाच्या कांड्या : उत्पादन वाढीचे शास्त्र
वीरेंद्र चव्हाण, हेमंत पाटील, डॉ. समाधान सुरवसे
----------------------------------
ऊस उत्पादनाचा विचार करताना शेतकरी प्रामुख्याने शेतातील उसांची संख्या हा महत्त्वाचा निकष मानतात. मात्र प्रत्यक्ष ऊस उत्पादन केवळ उसांच्या संख्येवर अवलंबून नसते. उसांची संख्या, कांड्यांची संख्या, लांबी, जाडी, वजन आणि त्यातील साखरेचे प्रमाण या सर्व घटकांचा उत्पादनावर परिणाम होतो. अधिक उत्पादनासाठी फक्त जास्त कांड्या असणे पुरेसे नाही; तर लांब, जाड, वजनदार आणि निरोगी ऊस तयार होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
ऊस आणि कांडी म्हणजे काय?
शेतकऱ्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर आपण संपूर्ण खोडाला ‘ऊस’ म्हणतो. या उसावर अनेक गाठी असतात आणि दोन गाठींमधील भागाला ‘कांडी (Internode)’ म्हणतात.
सोप्या भाषेत : गाठ -- कांडी -- गाठ -- कांडी -- गाठ.
कांडीची संख्या व लांबी ही उसाच्या एकूण लांबी आणि वजनावर परिणाम करणारी महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
उसाच्या कांड्यांचे उत्पादनातील महत्त्व
एकूण ऊस उत्पादन = प्रति एकर कापणीयोग्य उसांची संख्या × एका उसाचे सरासरी वजन
उदा. प्रति एकर ४० हजार सुदृढ ऊस आणि प्रत्येक उसाचे सरासरी वजन २ किलो असल्यास उत्पादन ८० टन/एकर होते. २.२५ किलो सरासरी वजन असल्यास उत्पादन ९० टन प्रति एकर होते.
चांगल्या ऊस कांड्यांची वैशिष्ट्ये
- निरोगी व जोमदार कांडी
- योग्य लांबी व पुरेशी जाडी
- चांगले वजन
- रोग व किडींचा कमी प्रादुर्भाव
- जातीला अनुरूप आकार व परिपक्वता
- चांगला साखर साठा
एका उसात किती कांड्या असतात?
कांड्यांची संख्या ही उसाची जात, वाढीची अवस्था, पाणी, पोषण, तापमान आणि पीक व्यवस्थापन यावर अवलंबून बदलते. ही संख्या सर्व जातींसाठी निश्चित नसते.
अ.न. --- कांडी संख्या --- परिणाम
१. --- १५–१८ --- कमी वाढ
२. --- १८–२२ --- मध्यम वाढ
३. --- २२–२६ --- चांगली वाढ
४. --- २६–३० --- उत्कृष्ट वाढ
वरील संख्या प्रत्येक जातीसाठी परिस्थितीनुसार बदलू शकते.
कांड्याची लांबी
कांड्यांची लांबी ही उसाच्या एकूण लांबीवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे.
अ.न. --- कांडी लांबी --- परिणाम
१. --- ८ सेंमीपेक्षा कमी --- मर्यादित
२. --- ८–१२ सेंमी --- सामान्य
३. --- १२–१६ सेंमी --- चांगली
४. --- १६ सेंमीपेक्षा जास्त --- उत्कृष्ट वाढ
कांडी मोजण्याची पद्धत
शेतातील प्रतिनिधिक ऊस निवडून प्रत्येक उसातील कांड्यांची संख्या मोजावी. मोजपट्टी/मेजरिंग टेपच्या साहाय्याने कांड्यांची लांबी मोजावी. विविध ठिकाणांहून नमुने घेऊन सरासरी काढल्यास शेताची स्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजते.
कांड्यांची संख्या, लांबी, व्यास आणि वजन यांची नोंद केल्यास उत्पादनक्षमतेचे अधिक अचूक मूल्यांकन करता येते.
कांड्यांची संख्या व लांबीचे गणित
२० कांड्या × १० सेंमी = २०० सेंमी
२४ कांड्या × १३ सेंमी = ३१२ सेंमी
कांड्यांची संख्या आणि प्रत्येक कांड्याची लांबी वाढल्यास उसाची एकूण लांबी वाढू शकते.
ऊस तयार होण्याचे प्रमुख टप्पे
अ.न. --- कालावधी --- वाढ
१ --- ०–४५ दिवस --- उगवण व मुळांची वाढ
२ --- ४५–९० दिवस --- फुटव्यांची निर्मिती व वाढ
३ --- ९०–१२० दिवस --- कांड्यांच्या वाढीची सुरुवात
४ --- १२०–२४० दिवस --- जलद कांडीनिर्मिती, लांबी व विस्तार
५ --- २४०–३०० दिवस --- कांड्यांची जाडी व साखर साठवण
६ --- ३०० दिवसांनंतर --- परिपक्वता व साखर साठवण.
१२०–२४० दिवसांचा कालावधी हा कांड्यांची लांबी व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात पाण्याचा ताण टाळणे, संतुलित पोषण आणि पीक निरोगी ठेवणे आवश्यक आहे.
कांड्या आखूड राहण्याची प्रमुख कारणे
१. पाण्याचा ताण – जलद वाढीच्या काळात पाण्याचा ताण आल्यास पेशींचा विस्तार कमी होतो आणि कांड्या आखूड राहू शकतात.
२. नत्राची कमतरता किंवा असंतुलित वापर – नत्राची कमतरता वाढ व प्रकाशसंश्लेषण कमी करू शकते; अतिनत्रामुळे अनावश्यक पर्णवाढ व परिपक्वतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
३. पालाशची कमतरता – पालाश पाण्याचे संतुलन, प्रकाशसंश्लेषण, अन्नद्रव्यांचे वहन आणि कांड्यांची मजबुती यासाठी महत्त्वाचे आहे.
४. तणांची स्पर्धा – तणांमुळे पाणी, अन्नद्रव्ये आणि प्रकाशासाठी उसाशी स्पर्धा होते.
५. अतिदाट लागवड – पानांना पुरेसा प्रकाश न मिळाल्यास प्रकाशसंश्लेषण व कांड्यांची वाढ प्रभावित होऊ शकते.
६. रोग व किडी – कांडी पोखरणाऱ्या किडी किंवा पानांचे नुकसान करणारे रोग यामुळे वाढ व उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
पाणी व्यवस्थापन
उसाच्या सक्रिय कांडी निर्मिती व वाढीच्या काळात पाण्याचा ताण टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ठिबक सिंचनाद्वारे पिकाच्या गरजेनुसार नियमित व कार्यक्षम पाणी व्यवस्थापन करता येते.
९० – १२० दिवस : वाढत्या गरजेनुसार पाणी द्यावे.
१२० – १८० दिवस : पाण्याची जास्त गरज असते.
१८० – २४० दिवस : जमिनीत पुरेसा ओलावा ठेवावा.
२४० दिवसांनंतर : पिकाची अवस्था व परिपक्वता लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करावे.
संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन
वजनदार आणि निरोगी ऊस तयार करण्यासाठी केवळ नत्रावर भर देणे योग्य नाही. नत्र, स्फुरद, पालाश आणि आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन माती परीक्षण व पिकाच्या गरजेनुसार करणे आवश्यक आहे.
नत्र : पर्णवाढ, प्रकाशसंश्लेषण आणि वाढीसाठी आवश्यक; अतिनत्र टाळावे.
स्फुरद : मुळांची वाढ आणि ऊर्जा चयापचयासाठी महत्त्वाचे.
पालाश : पाण्याचे संतुलन, अन्नद्रव्यांचे वहन, कांड्यांची मजबुती आणि साखर संचयाशी संबंधित महत्त्वाचे अन्नद्रव्य.
जस्त व बोरॉन : वनस्पतीच्या विविध शारीरिक प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये.
पाचट आच्छादनाचे फायदे
उसाचे पाचट जाळण्याऐवजी शेतात आच्छादन म्हणून ठेवणे फायदेशीर आहे. यामुळे जमिनीतील ओलावा टिकण्यास, बाष्पीभवनातून होणारी पाण्याची हानी कमी होण्यास, मातीचे तापमान नियंत्रित राहण्यास, तणांची वाढ कमी होण्यास, सेंद्रिय पदार्थ व सूक्ष्मजिवांची क्रियाशीलता वाढण्यास मदत होते.
शेतात कांड्यांचे मूल्यांकन कसे करावे?
विविध ठिकाणांहून प्रतिनिधिक नमुने घेऊन उसाची एकूण लांबी, कांड्यांचा व्यास, एकूण कांड्यांची संख्या, कांड्यांची सरासरी लांबी, उसाचे वजन आणि रोग-किडींची स्थिती नोंदवावी. आवश्यक असल्यास रसातील Brix/TSS इत्यादी गुणवत्ता घटकही नोंदवता येतात.
वजनदार ऊस तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे?
-योग्य व शिफारस केलेली ऊस जात निवडावी.
-निरोगी बेणे/रोपे वापरावीत.
-योग्य अंतरावर लागवड करावी.
-सुरुवातीच्या काळात पीक तणमुक्त ठेवावे.
-१२०–२४० दिवसांच्या काळात पाण्याचा ताण टाळावा.
-ठिबक सिंचनाचा कार्यक्षम वापर करावा.
-माती परीक्षणानुसार संतुलित खत व्यवस्थापन करावे.
-नत्राचा अतिरेक टाळावा.
-पालाशचा योग्य पुरवठा करावा.
-पाचट जाळण्याऐवजी आच्छादन म्हणून वापरावे.
-रोग व किडींचे वेळेवर व्यवस्थापन करावे.
जास्त उत्पादनासाठी फक्त उसांची संख्या वाढवणे पुरेसे नाही. प्रत्येक उसाची लांबी, जाडी, कांड्यांची संख्या, कांड्यांची लांबी, वजन, आरोग्य आणि परिपक्वता याकडेही तितकेच लक्ष देणे आवश्यक आहे.
वीरेंद्र चव्हाण, ९७६७२६२३४२
वैज्ञानिक अधिकारी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु., पुणे
----------------------------------
छायाचित्रे -
PNE26W46136 ऊस व कांडी - गाठ -- कांडी -- गाठ -- कांडी -- गाठ.
PNE26W46138 - उसातील कांड्यांची लांबी व जाडी मोजताना.
PNE26W46137 - कांड्यांची संख्या व एकूण लांबी मोजताना.
PNE26W46139 ः आखूड कांडी.