मांडवगण फराटा, ता. १५ : ऊस वाहतुकीच्या नावाखाली वाहतूक नियमांना हरताळ फासणाऱ्या चालक आणि वाहनमालकांवर आता पोलिसांची करडी नजर राहणार आहे. जिल्ह्यात ट्रॅक्टरला बेकायदेशीरपणे तीन ट्रॉली जोडून ऊस वाहतूक करणे अथवा पिकअप वाहनातून नियमबाह्य पद्धतीने मजुरांची वाहतूक करणे संबंधितांना चांगलेच महागात पडणार आहे. अशा वाहनांवर कारवाई करताना चालकासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा मांडवगण फराटा पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी दिला.
ऊसतोड हंगाम सुरू झाल्याने पोलिस चौकीच्या हद्दीत ऊस वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरला तीन ट्रॉली जोडून ऊस वाहतूक करण्याचे प्रकार, तसेच पिकअप वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक मजूर बसवून वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. नियमबाह्य भार आणि धोकादायक मजूर वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याने पोलिसांनी आता थेट कारवाईची भूमिका घेतली आहे.
अशी होणार कारवाई
- ऊस गुऱ्हाळ चालक आणि वाहतूकदारांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे.
- ट्रॅक्टरला विनापरवाना अथवा बेकायदेशीररीत्या तीन ट्रॉली जोडणे आणि पिकअपमधून नियमबाह्य पद्धतीने मजुरांची वाहतूक करणे टाळावे.
- नियमांचे उल्लंघन आढळल्यास केवळ चालकावर नव्हे तर संबंधित वाहनमालकावरही कायदेशीर कारवाई केली जाईल.
रात्रीच्या वाहतुकीवर विशेष लक्ष
ऊस वाहतुकीची बहुतांश वर्दळ रात्रीच्या वेळी होत असल्याने नियमबाह्य वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. अतिरिक्त ट्रॉली, क्षमतेपेक्षा अधिक भार आणि पिकअपमधून धोकादायक पद्धतीने मजूर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. शिरूर पोलिस ठाणे व पुणे ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
समाजमाध्यमांवरूनही थेट सूचना
ऊस वाहतुकीसंदर्भातील नियमांची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचावी यासाठी मांडवगण फराटा पोलिसांकडून सोशल मीडियाद्वारे परिपत्रक प्रसारित करून स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करून कारवाईला सामोरे जाऊ नये, यासाठी ऊस गुऱ्हाळ चालक, व्यापारी, उत्पादक आणि वाहतूकदारांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक पवार यांनी केले आहे.