विवाहित तरुणाची आत्महत्या,
पत्नीसह आठ जणांविरोधात गुन्हा
राहुरी, ता. ७ : कौटुंबिक वादातून तरुणाने प्रवरा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. दोन दिवसांच्या शोधानंतर मृतदेह नदीपात्रात आढळून आला. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात मृताच्या पत्नीसह आठ जणांच्या विरोधात मारहाण व धमकी देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश अप्पासाहेब वाणी (वय ३५, रा. झरेकाठी, ता. संगमनेर, हल्ली रा. लोणी, ता. राहाता) असे मृताचे नाव आहे. शीतल सतीश वाणी (पत्नी), संदीप सुनील तांबे (मेहुणा), सुनील सीताराम तांबे (सासरे), मंगल सुनील तांबे (सासू, सर्वजण रा. दुर्गापूर, ता. राहाता), सूरज कुरकुटे, दादा कुरकुटे (दोघेही रा. लोणी बुद्रुक, ता. राहाता), शिवाजी शिंदे (साडू) व रेणुका शिवाजी शिंदे (मेव्हणी, दोघेही रा. समनापूर, ता. संगमनेर), अशी आरोपींची नावे आहेत.
मृताची आई प्रमिला अप्पासाहेब वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, सतीश लोणी येथील प्रवरा रुग्णालयात गेल्या १५ वर्षांपासून कर्मचारी म्हणून कार्यरत होता. त्याचा विवाह २०१७ मध्ये झाला होता. लग्नानंतर पत्नी व तिच्या माहेरच्या मंडळींकडून पैशांवरून, तसेच घराच्या मालकीवरून वारंवार वाद होत असे. लोणी येथे सतीशने घर बांधल्यानंतर ते पत्नीच्या नावावर करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला.
सतीशला धमकावून घर पत्नीच्या नावावर करून घेण्यात आले. या सततच्या त्रासाबाबत त्याने आई-वडिलांना सांगितले होते. २१ जून २०२६ रोजी लोणी येथील घरी पत्नी व नातेवाइकांनी पैशांवरून वाद घालून त्याला मारहाण केली अन् घराबाहेर काढून दिले. त्यानंतर तो भाड्याच्या खोलीत एकटा राहत होता. पत्नीच्या त्रासामुळे तो मानसिक तणावाखाली होता. त्याच दिवशी सायंकाळी धानोरेच्या शिवारातील चणेगाव बंधाऱ्यावरून प्रवरा नदीत उडी घेतली. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ३०० मीटर अंतरावर सतीशचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला, असेही फिर्यादीत म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.