पान ९ - २७ साठी
--------
आम्ही स्वयंसेवी
--------------------
‘गावकूस’च्या माध्यमातून शाश्वत शेतीचे मॉडेल
----------------
कचारी सावंगा (ता. काटोल, जि. नागपूर) येथील प्रगतिशील शेतकरी अनंत भोयर यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेती, शेतीमाल प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि ग्रामीण विकासाचा अनोखा संगम साधत ‘गावकूस’ या संस्थेच्या माध्यमातून शाश्वत शेतीचा आदर्श निर्माण केला आहे. चौदा एकर क्षेत्रावर बहुपीक पद्धती स्वीकारून त्यांनी ‘उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्त्वाचे’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केला आहे.
---------------
विनोद इंगोले
--------------------
विदर्भातील बहुतांश भागात संत्रा, कापूस आणि सोयाबीन ही पारंपरिक पिके घेतली जात असताना अनंत भोयर यांनी सुमारे २२ वर्षांपूर्वी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारला. सुरुवातीला आले आणि लसूण यांसारखी पिके घेतल्यानंतर त्यांनी स्थानिक हवामानाशी सुसंगत आणि पोषणमूल्यांनी समृद्ध अशा लाल अंबाडी, चवळी, बरबटी, विविध प्रकारची हळद, मोहरी, धने, जवस, मेथी आदी पिकांचा समावेश करून शेतात जैवविविधता वाढविली. या बहुपीक पद्धतीमुळे उत्पादनातील जोखीम कमी झाली, तर ग्राहकांना विविध प्रकारचे रसायन अवशेषमुक्त अन्नधान्य उपलब्ध होऊ लागले.
लाल अंबाडीने दिली राष्ट्रीय ओळख ः
गावकुसच्या माध्यमातून राबविण्यात उल्लेखनीय बाब म्हणजे लाल अंबाडीचे संवर्धन आणि मूल्यवर्धन. एकेकाळी ग्रामीण भागातील पारंपरिक पीक असलेल्या अंबाडीला ‘गावकूस’च्या माध्यमातून नवसंजीवनी मिळाली. अंबाडीच्या पानांपासून भाजी, लोणचे, फुलांपासून सरबत, चटणी, कँडी, जॅम, जेली, लाल चहा, तर बियांपासून खाद्यतेल, पीठ, भाकरी आणि भजे यांसारखे विविध पदार्थ तयार केले जातात. आरोग्यवर्धक गुणधर्मांमुळे या उत्पादनांना बाजारात चांगली मागणी मिळाली. अंबाडीच्या प्रक्रियायुक्त उत्पादनांची देशभर विक्री होत असल्याने या मागे असलेल्या अनंत भोयर यांना देखील ‘अंबाडी मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळख मिळाली आहे.
सोलर ड्रायरचे स्वदेशी तंत्रज्ञान ः
ताज्या भाज्या आणि फुलांचा टिकाऊपणा कमी असल्याने बाजारपेठेतील जोखीम वाढते. यावर उपाय म्हणून भोयर यांनी स्वतःच्या कल्पकतेतून पिरॅमिड आकाराचे अल्पखर्ची सौर वाळवण यंत्र विकसित केले. या सोलर ड्रायरच्या साह्याने अंबाडी, मेथी, पालक, पळसफुले, शेवगा आणि विविध रानभाज्या वाळवून वर्षभर विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या या तंत्रज्ञानाचा वापर विदर्भासह मुंबई आणि पंजाबमधील अनेक शेतकऱ्यांनीही केला आहे. गावकुसच्या माध्यमातून या तंत्रज्ञानाचा प्रसार केला जात आहे.
शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण ः
गावकुसच्या माध्यमातून फायदेशीर शेतीचे हे मॉडेल प्रसारावर भर देण्यात आला आहे. २००८ मध्ये कृषी विभागाच्या सहकार्याने ‘ग्रामोन्नती’ संस्थेमार्फत २१ शेतकरी गटांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर २०१२ मध्ये संस्थेद्वारे परिसरातील २० गावांमध्ये सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन करण्यावर भर देण्यात आला. महिला सक्षमीकरण क्षेत्रातही संस्थेचे मोठे कार्य आहे. अंतर्गत २०१३ मध्ये महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या सहकार्याने ७२ महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सध्या पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत विविध जिल्ह्यांतील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषिसखी यांना शेतमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन या विषयावर प्रशिक्षण दिले जात आहे.
साहित्य, संशोधन आणि जनजागृती ः
गावकुसाच्या उपक्रमांचा व्यापक प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने अनंत भोयर यांनी सेंद्रिय शेती आणि ग्रामीण जीवनशैलीवर अनेक लेख, मालिका आणि पुस्तके लिहिली आहेत. त्यांची सेंद्रिय खत, हराळी, मायाजाळ, आभाळझुंज, शिरान आणि गावकुसातले हबकमुड्डे ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच रानभाज्यांचा खानाखजिना आणि शेतीमालावरील प्रक्रिया व मूल्यवर्धन ही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.आकाशवाणी, दूरदर्शन आणि विविध वृत्तपत्रांतून त्यांनी सातत्याने शाश्वत शेतीचा प्रचार केला आहे.
‘उत्पादन नव्हे, उत्पन्न’ हा यशाचा मंत्र ः
रासायनिक शेतीच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन गावकुसच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारताना भोयर यांना सुरुवातीच्या काळात उपहास आणि विरोध सहन करावा लागला. मात्र त्यांनी हार न मानता आपल्या प्रयोगांद्वारे एक यशस्वी मॉडेल उभे केले. आज अनेक शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीकडे वळले आहेत. ‘टनाने उत्पादन घेण्यापेक्षा तोळ्याने विकून अधिक उत्पन्न मिळविणे महत्त्वाचे आहे,’ हा त्यांचा विचार आज अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ‘गावकूस’च्या माध्यमातून त्यांनी शेती, प्रक्रिया, मूल्यवर्धन, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैली यांचा एकात्मिक नमुना उभा करून ग्रामीण विकासाची नवी दिशा दाखविली आहे. त्यांच्या या झपाटलेल्या प्रवासामुळे ते आज विदर्भातील नव्हे तर देशातील नैसर्गिक शेती चळवळीतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
-----------------------------------
इन्फो ः
बाजारपेठेत ‘गावकूस’ ब्रॅण्ड ः
शेतीमालाला थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अनंत भोयर यांनी ‘गावकूस’ हा ब्रॅण्ड विकसित केला. या ब्रॅण्डअंतर्गत चाळीस पेक्षा अधिक प्रक्रियायुक्त आणि मूल्यवर्धित उत्पादनांची देशभर ऑनलाइन विक्री केली जाते. यामध्ये अंबाडी उत्पादने, मोरिंगा पावडर, गिलोय पावडर, पळस हर्बल चहा, तरोटा हर्बल कॉफी, सुक्या रानभाज्या आणि विविध नैसर्गिक खाद्यपदार्थांचा समावेश आहे. शेताच्या बांधावरील आणि परिसरातील वनस्पतींमधूनही उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतात, हे त्यांनी दाखवून दिले.
---------------------------------
इन्फो ः
पुरस्कारांनी गौरव ः
२००९ : महाराष्ट्र शासनाचा सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कार
२०१० : एम. एस. स्वामिनाथन फाउंडेशनची एनव्हीए फेलोशिप
२०१७ : नोएडा येथे झालेल्या १९ व्या आंतरराष्ट्रीय जैविक परिषदेत शेतीमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन विषयावर सादरीकरण
२०१८ : ऑरगॅनिक इंडियातर्फे पाच लाख रुपयांचा राष्ट्रीय धरतीमित्र प्रथम पुरस्कार
२०२६ : तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाचा स्व. नाशिकराव तिरपुडे जीवनगौरव पुरस्कार
---------------------------------------------------
संपर्क ः अनंत भोयर, ९०४९६ ४१४७४
-----------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.