पुणे

विवेकानंद भाषण लेख

CD

स्मरण एका ऐतिहासिक भाषणाचे


शिकागोच्या जागतिक धर्म परिषदेत ११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंद यांचे भाषण झाले. हा दिवस विश्वबंधुत्व दिन म्हणून पाळला जातो. या प्रेरणादायी व ऐतिहासिक व्याख्यानाच्या स्थळाला भेट दिल्यानंतर त्याविषयी मनात उमटलेले तरंग.

डॉ. जयंत साठे


स्वामी विवेकानंद १८९३च्या उन्हाळ्यात शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेत भाषण करण्यासाठी पोहोचले. शिकागोला पोहोचल्यावर त्यांना समजले की, आपण हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करत असल्याचे दर्शवणारी अधिकृत कागदपत्रे आवश्यक आहेत. स्वामीजींना या अटीची कल्पना नव्हती आणि त्यांच्याकडे ती कागदपत्रे नव्हती. काय करावे हे त्यांना समजत नव्हते. शिवाय, शिकागोमध्ये हॉटेलमध्ये तीन महिने राहण्याइतकेही पैसे त्यांच्याकडे नव्हते. त्याचवेळी त्यांनी बॉस्टनला जाऊन लेखिका, कवयित्री आणि व्याख्यात्या मिस केट सॅनबॉर्न यांच्याकडे राहण्याचा निर्णय घेतला.
शिकागोच्या प्रवासादरम्यान त्यांची मिस सॅनबॉर्न यांच्याशी भेट झाली होती. मिस सॅनबॉर्न यांनी स्वामीजींना त्यांच्या मित्रपरिवारासमोर वेदांतावर व्याख्याने देण्यासाठी बॉस्टनला येण्याचे आमंत्रण दिले होते. तेथे पोहोचल्यावर स्वामीजींनी मिस सॅनबॉर्न यांच्या बुद्धिजीवी मित्रमंडळींसमोर व्याख्याने द्यायला सुरुवात केली. अशाच एका व्याख्यानादरम्यान स्वामीजींची भेट हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक जॉन हेन्री राइट यांच्याशी झाली. प्रा. राइट हे हार्वर्डमध्ये अभिजात ग्रीक भाषेचे प्राध्यापक होते. स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन त्यांनी व त्यांच्या पत्नी मेरी यांनी स्वामीजींना मॅसॅच्युसेट्सच्या किनारपट्टीवरील त्यांच्या कौटुंबिक उन्हाळी निवासस्थानी एका आठवड्याच्या अखेरीस राहण्याचे आमंत्रण दिले.
या भेटीदरम्यान झालेल्या संवादातून प्रा. राइट यांना कळले की, स्वामीजींना शिकागोच्या जागतिक धर्म परिषदेत भाषण करायचे आहे; पण त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत. यावर प्रा. राइट म्हणाले, ‘‘स्वामींना कागदपत्रे मागणे म्हणजे सूर्याला त्याच्या प्रकाशण्याच्या अधिकाराचा पुरावा मागण्यासारखे आहे.’’ प्रा. राइट यांच्या या शिफारसपत्रामुळे स्वामीजींना ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागोच्या जागतिक धर्म परिषदेत भाषण करण्याची संधी मिळाली. स्वामीजींचे नाव वक्त्यांच्या यादीत उशिरा समाविष्ट झाल्यामुळे त्यांना संध्याकाळी पाच वाजताची वेळ देण्यात आली. स्वामीजी इतर प्रतिनिधींसोबत मंचावर बसून भाषणे ऐकत आणि श्रोत्यांचे निरीक्षण करत होते. दुपार उलटून गेल्यावर विविध धर्मांच्या प्रतिनिधींची सारखीच भाषणे ऐकून श्रोते थकले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. श्रोत्यांमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण करण्यासाठी काहीतरी वेगळे करायला हवे, हे त्यांना जाणवले. भाषणासाठी उभे राहताच त्यांच्या विशिष्ट वेशभूषेने श्रोत्यांचे लक्ष वेधून
घेतले. स्वामीजी उभे राहिले आणि म्हणाले; ‘‘अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो...’’ औपचारिक संबोधने टाळणाऱ्या या एका वाक्याने प्रथेला छेद दिला. सुमारे सात हजार श्रोत्यांनी दोन मिनिटे उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात याला प्रतिसाद दिला. त्या दिवशीचे स्वामीजींचे मुख्य भाषण अवघे ४७३ शब्दांचे आणि दोन-तीन मिनिटांचेच होते, पण त्याने श्रोत्यांच्या कल्पनाशक्तीला चालना दिली. त्यामुळे २७ सप्टेंबर रोजी परिषद संपण्यापूर्वी स्वामीजींना आणखी पाच वेळा भाषण करण्याची विनंती करण्यात आली.
त्यानंतर स्वामीजी आणखी काही दिवस शिकागोमध्ये राहिले. अनेक श्रीमंत कुटुंबांनी त्यांना आपल्या घरी भाषणासाठी आमंत्रित केले. एके दिवशी त्या काळातील जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जे. डी. रॉकफेलर हे गर्विष्ठपणे स्वामीजींच्या निवासस्थानी आले आणि आपण ज्यांच्याबद्दल ऐकले आहे त्या स्वामींना भेटण्याची मागणी केली. स्वामीजींसोबत एक तास घालवल्यानंतर रॉकफेलर हे शांत, बदललेले आणि आध्यात्मिक वृत्तीचे होऊन बाहेर पडले. स्वामीजींच्या भेटीनंतर रॉकफेलर यांनी काढलेले हे प्रसिद्ध उद्गार आहेत: ‘‘आमची उधळपट्टी, स्वार्थी वृत्ती आणि इतरांविषयच्या उदासीनतेच्या चुका नम्रपणे मान्य करून, देवावर, स्वतःवर आणि मानवतेवर विश्वास ठेवून, एक चांगले जग घडवण्यात आपला वाटा सन्मानाने उचलण्याचा धैर्याने संकल्प करून आपण पुढे जाऊया.’’
स्वामीजींच्या धर्मपरिषदेतील भेटीमागील या इतिहासाची थोडीफार माहिती असल्यामुळे, माझी पत्नी शशी आणि मला स्वामीजींनी जिथे हे प्रसिद्ध भाषण दिले ती जागा पाहण्याची नेहमीच इच्छा होती. पन्नास वर्षांपूर्वी आम्ही शिकागोमध्ये राहत होतो, पण स्वामीजींचे भाषण नेमके कुठे झाले हे आम्हाला माहीत नव्हते. मात्र काही वर्षांपूर्वी आम्हाला कळले की आजचे ‘शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट’ हीच ती जागा आहे, जिथे स्वामी विवेकानंदांनी १८९३ मध्ये धर्मपरिषदेत भाषण केले होते. शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट हे कलादालन आम्हा दोघांचे पूर्वीपासूनचे आवडते ठिकाण आहे. इन्स्टिट्यूटमधील या पवित्र जागेचा शोध घ्यायचा, असे आम्ही आधीच ठरवले होते. जुलै २०२६ च्या सुरुवातीला आम्ही आवर्जून तेथे गेलो. मूळ इमारतीच्या नूतनीकरणानंतर स्वामीजींनी भाषण दिलेले सभागृह आता ‘फुलरटन हॉल’ या नावाने ओळखले जाते, हे आम्हाला समजले. सभागृहाच्या बाहेरील भिंतीवर एक फलक आहे, जो हीच ती भाषणाची जागा असल्याचे सांगतो.
दररोज सकाळी १० वाजता आणि दुपारी १२ वाजता एक कर्मचारी येऊन दहा मिनिटांसाठी सभागृह उघडतो. हे गृहस्थ स्वामी विवेकानंदांबद्दल बरीच माहिती बाळगून होते. आम्हाला सभागृहात फिरण्याची, छायाचित्रे काढण्याची, एखाद्या खुर्चीवर बसण्याची आणि त्या ठिकाणाचे वातावरण अनुभवण्याची परवानगी देण्यात आली. फक्त मंचावर न जाण्याची विनंती करण्यात आली, जी रास्तच होती. याचे कारण मंचावर सभागृहासाठी लागणारी बरीच इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवलेली होती. या सभागृहात असणे आम्हाला खूप आनंददायी वाटले. स्वामीजींच्या १८९३च्या भाषणाचा मजकूर ‘फुलरटन हॉल’मधून वरच्या मजल्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
प्रतिभावान भारतीय कलाकार जितीश कलात यांनी २०१७ मध्ये एलईडी दिव्यांच्या साहाय्याने स्वामी विवेकानंदांच्या भाषणाचा मजकूर दाखवणारी एक कलाकृती उभारली. धार्मिक कट्टरता, द्वेष आणि असहिष्णुता संपवण्याचे आवाहन करणारे हे भाषण स्वामी विवेकानंदांनी ९/११ (१८९३) रोजी दिले होते. स्वामीजींच्या भाषणाची तारीख आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याचा स्मृतिदिन ९/११ यांच्यातील योगायोग जितीश यांच्या लक्षात आला.
पुढील फोटो PNE26W48582

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Road Project : रत्नागिरीकरांसाठी मोठी बातमी! मिरजोळे एमआयडीसीच्या मुख्य रस्त्याचे 24 कोटींतून होणार चौपदरीकरण; असा असणार नवा लूक

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

SCROLL FOR NEXT