टाकळी हाजी, ता. १५ : टाकळी हाजीसह शिरूर तालुक्यातील बेट भागातील शेतकरी आणि वाड्या-वस्त्यांवरील विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वतंत्र गावठाण फीडरची कामे अनेक ठिकाणी अद्याप प्रलंबित असल्याने काही वाड्या-वस्त्यांपर्यंत स्वतंत्र गावठाण फीडरची योजना पोहोचलेली नाही. परिणामी, नागरिकांना शेतीपंप रोहित्रावर अवलंबून राहावे लागत असून, रात्रीचे भारनियमन आणि दिवसा खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे नागरिक हतबल झाले आहेत.
टाकळी हाजी, जांबूत, पिंपरखेड, कवठे येमाई आणि सविंदणे परिसरातील अनेक वाड्या-वस्त्यांवर स्वतंत्र गावठाण फीडरची सुविधा अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना नियमित घरगुती वीजपुरवठ्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दिवसा देखील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने घरगुती कामांसह शेतीच्या कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे ज्या भागात गावठाण फीडरची सुविधा अद्याप उपलब्ध नाही, तेथील शेतातील घरांना नियमानुसार वीजजोडणी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
टाकळीत अनेक शेतकरी शेतातच वास्तव्यास आहेत. त्यांच्या शेताजवळ शेतीपंपासाठी फीडर कार्यान्वित असतानाही घरगुती वीजजोडणीसाठी अर्ज केल्यानंतर तो मंजूर होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. एकीकडे स्वतंत्र गावठाण फीडरची योजना अद्याप मंजूर अथवा पूर्ण झालेली नाही तर दुसरीकडे जवळच वीजपुरवठ्याची सुविधा उपलब्ध असतानाही घरगुती वीजजोडणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
बिबट्याच्या भीतीमुळे जीव मुठीत
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील टाकळी हाजी, जांबूत, पिंपरखेड, कवठे येमाई, सविंदणे हा परिसर बिबट्यांच्या वावरामुळे संवेदनशील बनला आहे. या भागात बिबट्यांच्या हल्ल्यात नागरिकांचे जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे.
शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
शेतीपंपांना रात्री वीज मिळत असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना अंधारात शेतात जावे लागते. बिबट्यांचा धोका आणि वीज भारनियमन यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणींकडे शासन आणि वीज वितरण कंपनीने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.