टाकळी हाजी, ता. १७ : कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाकळी हाजी (ता. शिरूर) परिसरातील बेट भागात यंदा तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पावसाने ओढ दिल्याने जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झालेला नाही. विहिरींनीही तळ गाठला आहे. या बिकट परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी कांद्याची रोपे तयार करण्याकडे पाठ फिरविली आहे. यंदा कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे या भागातूनच कांदापीक हद्दपार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
टाकळी हाजीसह जांबूत, पिंपरखेड, वडनेर, फाकटे, चांडोह, निमगाव दुडे, म्हसे, डोंगरगण तसेच घोड व कुकडी नद्यांच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. या भागात हजारो कांदा चाळी उभारण्यात आल्या असून, कांदा हे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन बनले आहे.
दरवर्षी गणेशोत्सवानंतर शेतकरी कांद्याची रोपे तयार करण्याच्या कामाला सुरुवात करतात. दसरा-दिवाळीच्या काळात कांदा लागवडीला वेग येतो. या हंगामात लागवडीच्या कामासाठी मजुरांची मोठी मागणी असते. मात्र, यंदा परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पावसाअभावी जमिनीत पुरेसे पाणी मुरले नसल्याने कांदा लागवडीसाठी आवश्यक ओलावा उपलब्ध नाही. त्यामुळे लागवडीपूर्वीच शेतकऱ्यांनी माघार घेण्यास सुरुवात केली आहे.
फळबागा वाचविण्याची शेतकऱ्यांची कसरत
कुकडी प्रकल्पातील धरणे भरलेली असली, तरी शासनाने शेतीच्या पाण्यापेक्षा पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याची भूमिका जाहीर केल्याने नदी व कालव्यांना किती पाणी मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. विहिरींची पाणीपातळी खालावल्याने उपलब्ध पाण्यातून डाळिंबासह इतर फळबागा वाचविण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे.
कांदा उत्पादन घटण्याची भीती
सोयाबीन आणि बाजरीची काढणी झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी जमिनीची मशागत करून क्षेत्र तयार ठेवले आहे. मात्र, पाण्याची उपलब्धता नसल्याने आता या तयार क्षेत्रात कांदा लावायचा तरी कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे यंदा कांदा रोपे तयार करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.