लाेकसहभागतून स्मशानभूमीचा कायापालट
‘तळबीडला मुख्यमंत्री समृद्ध’अंतर्गत कामांना मिळाली गती
उंब्रज, ता. ४ : तळबीडमधील स्मशानभूमीचा लोकसहभागातून कायापालट होत असून, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विविध विकासकामांना गती मिळाली आहे. गावचे सुपुत्र व यशस्वी उद्योजक प्रदीप बाजीराव मोहिते यांनी स्वखर्चाने सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीच्या दोन शवदाहिन्या उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
गावाच्या विकासासाठी हातभार लावण्याच्या उद्देशाने मोहिते यांनी ही मदत दिली आहे. त्यामुळे अंत्यविधी प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा अधिक सुसज्ज झाल्या आहेत. पूर्वी अपुऱ्या साधनांमुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, नव्याने उपलब्ध झालेल्या शवदाहिन्यांमुळे ही गैरसोय दूर होणार आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने प्रदीप मोहिते यांचे आभार मानले.
दरम्यान, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून स्मशानभूमी परिसरात फरशी बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे परिसर स्वच्छ, सुस्थितीत व सुरक्षित झाला असून, ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली आहे.
स्मशानभूमीत दशक्रिया विधी हॉलचे प्लॅस्टर, फरशी, बैठक व्यवस्था, रंगकाम, दशक्रिया कट्टे, जुन्या शेडमधील रक्षा सावडण्यासाठी कट्टा, पत्रे बदलणे, संपूर्ण परिसरात फ्लेवर ब्लॉक बसविणे, पाण्याची टाकी, गार्डन, संरक्षण भिंत, गेट व कमान आदी कामे अद्याप प्रलंबित आहे.
ग्रामपंचायतीने ग्रामस्थ व दानशूर व्यक्तींना या कामांसाठी सढळ हाताने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. लोकसहभागातून होणाऱ्या कामांना विशेष गुणांकन मिळत असल्याने गावाच्या प्रगतीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सरपंच मृणालिनी मोहिते, उपसरपंच संगीता मोहिते, ग्रामविकास अधिकारी सुनील ढाणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केले आहे.
..........
कोट
..........
लोकसहभागातून गावाच्या मूलभूत सुविधांचा विकास साधण्याचा आदर्श तळबीडने घालून दिला आहे. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होत आहे.
- मृणालिनी मोहिते, सरपंच
........................
B00796
तळबीड ः लोकसहभागातून स्मशानभूमीचा झालेला कायापालट.
B00797
....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.