शिक्षकामुळे मजुरांचे संसार आगीपासून बचावले
उंडाळेच्या सुहास पाटील यांचे प्रसंगावधान; एक झोपडी जळून खाक
उंडाळे, ता. ३१ ः शिक्षक हा केवळ पुस्तकी ज्ञान देणारा गुरू नसून, संकटकाळी समाजाचा रक्षकही असतो, याचा प्रत्यय बुधवारी महारुगडेवाडी (ता. कऱ्हाड) येथे आला. शाळेत जात असताना ऊसतोड कामगारांच्या झोपड्यांना लागलेली आग पाहून, जिल्हा परिषद शाळा जिंतीचे प्राथमिक शिक्षक सुहास पाटील यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता धाव घेतली आणि एका मोठ्या दुर्घटनेतून नऊ कुटुंबांच्या संसाराला वाचवले.
बुधवारी (ता. २८) सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास सुहास पाटील हे शिक्षक शाळेत जात होते. महारुगडेवाडी परिसरातून जात असताना त्यांना निनाईदेवी साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांच्या झोपड्यांमधून आगीचे लोट आणि धुराचे लोट दिसले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली दुचाकी थांबवली आणि कोप्यांच्या दिशेने धाव घेतली.
सर्व कामगार उसाच्या फडात तोडणीसाठी गेले असल्याने झोपड्यांच्या परिसरात कोणीही नव्हते. आगीने रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली होती. सुहास पाटील यांनी प्रसंगावधान राखून आजूबाजूला असलेल्या साहित्याचा वापर करत आग आटोक्यात आणली. त्यांच्या या धडपडीमुळे काही ग्रामस्थही मदतीला धावून आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या आगीत एका झोपडीतील कपडे, अन्नधान्य व संसाराचे साहित्य जळून खाक झाले. मात्र, शिक्षकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे ही आग शेजारील नऊ झोपड्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच आटोक्यात आली. जर वेळ गाठली नसती, तर अनेक मजुरांचा संसार उघड्यावर पडला असता.
---------------------
कोट
विद्यार्थ्यांना मूल्यवर्धनाचे धडे आपण वर्गात देतोच; पण आज प्रत्यक्ष कृतीतून समाजाचे देणं फेडण्याची संधी मिळाली. त्या गोरगरीब मजुरांचे संसार वाचल्याचे समाधान मोठे आहे. ज्या मजुरांचे नुकसान झाले आहे त्यांना माझ्या परीने मी मदत देणार आहे.
- सुहास पाटील, शिक्षक.
--------------------------------
मजुरांचे पाणावलेले डोळे
आगीची बातमी समजताच ऊसतोड कामगार धावत आले. आपल्या झोपड्या सुरक्षित असल्याचे पाहून त्यांनी सुहास पाटील यांचे आभार मानले. ‘आमचा देवच धावून आला,’ अशी भावना एका मजुराने व्यक्त केली. शिक्षकाच्या या दातृत्वाचे आणि धाडसाचे संपूर्ण उंडाळे परिसरात कौतुक होत आहे. पुस्तकातील माणुसकीचा धडा आज श्री. पाटील यांनी कृतीतून समाजाला शिकवला आहे, असेच म्हणावे लागेल.
-------------------------
00814, 00812
महारुगडेवाडी : आगीत जळून खाक झालेली झोपडी.
---------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.