शिक्षकांकडून भटक्या श्वानांची गणना का?
सरकारच्या स्पष्टीकरणानंतरही केजरीवाल यांचा सवाल
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ३०ः ‘‘शिक्षकांना भटक्या श्वानांची गणना करण्याचे निर्देश देणारा कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही,’’ असे दिल्ली सरकारने स्पष्ट केले असले तरी आम आदमी पक्षाने(आप) या मुद्द्यावरून भाजप सरकारवर आगपाखड केली आहे. ‘‘दिल्लीतील शिक्षक मुलांना शिकवणार की रस्त्यावरील भटक्या श्वानांची गणना करणार?’’ असा सवाल ‘आप’चे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.
‘‘शिक्षकांना भटक्या श्वानांची गणना करण्यास सांगितले जात आहे. यातून भाजप सरकारचे विचार आणि त्यांची प्राथमिकता दिसून येत आहे. भाजपसाठी शिक्षण हा मुद्दा नाही. ते शिक्षकांचा अपमान करत असून, शाळादेखील उद्ध्वस्त करत आहेत. ‘आप’सरकारच्या काळात आम्ही शिक्षकांना सन्मान दिला. त्यांच्यावरील अनावश्यक कामाचे ओझे कमी केले आणि मुलांच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राथमिकता दिली. शिक्षकांना प्रशिक्षणासाठी विदेशात पाठवले. शाळांची स्थिती सुधारली. आता हे सर्व उद्ध्वस्त करण्याचे काम विद्यमान सरकार करीत आहे,’’ अशी टीका केजरीवाल यांनी समाज माध्यमातून केली.