‘रयत’ स्कूलमध्ये
शिक्षक दिन उत्साहात
कऱ्हाड, ता. ७ ः रयत शिक्षण संस्थेच्या रयत इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिक्षक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्राचार्या रोहिणी एन. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
शिक्षक दिनानिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत विद्यार्थ्यांना विविध विषयांचे अध्यापन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत येऊन घेतलेले तास हा उपक्रम विशेष आकर्षणाचा ठरला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांचे कार्य, जबाबदारी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. याचबरोबर सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीने शिक्षकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शिक्षकांच्या आरोग्याची विविध प्रकारे तपासणी करण्यात आली. शिक्षकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन समन्वयक विद्या काकडे, अमृता चव्हाण आणि श्रीलता कुंभार यांच्या सहकार्याने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिक्षकांच्या योगदानाचा गौरव, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी आदराची भावना निर्माण करणे तसेच शिक्षकांच्या आरोग्याची काळजी घेणे, या उद्देशाने आयोजित केलेला शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात झाला.