शिक्षकदिनीच सोलापुरात शिक्षकांचा मूकमोर्चा
जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी; पोलिसांनी १० अटी टाकून दिली परवानगी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३ : विनाअनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांवरील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक मूकमोर्चा काढणार आहेत. शिक्षक दिनीच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीने सोलापुरात या मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला जाणार आहे. या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातही मोर्चा निघणार आहे. मोर्चात विविध शैक्षणिक संघटना, संस्थाचालक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत. चार हुतात्मा पुतळा ते जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेट असा मोर्चाचा मार्ग आहे. दुपारी २ वाजता मोर्चाला सुरवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीने पोलिस प्रशासनाकडून परवानगी घेतली आहे. मोर्चासाठी सोलापूर शहर पोलिसांनी १० अटी टाकून परवानगी दिली आहे. यात मोर्चा निश्चित मार्गानेच काढला जावा, शांततेत मोर्चा पार पडेल याची जबाबदारी आयोजकांवर राहील, मोर्चामुळे सार्वजनिक रस्त्यास अडथळा येऊ नये, शाळा, महाविद्यालय, रुग्णालये, शासकीय कार्यालयांपासून १०० मीटर अंतरात ध्वनिक्षेपक वापरू नये, मोर्चात प्राणी, शस्त्राचा वापर करू नये, इतरांच्या धार्मिक भावना दुखावतील अशा घोषणा करू नयेत, मोर्चात वाहनांचा वापर करू नये, नियम व अटींचा भंग झाल्यास पोलिसांनी दिलेल्या परवानगीचे आदेश रद्द केले जातील, सोलापूर आयुक्तालयात मुंबई पोलिस कायद्यातील कलम ३७(१),(३) लागू असल्याने त्या आदेशाचा भंग नको, अशा अटी घालून पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली आहे.
---
चौकट
मोर्चात पोलिसांकडून डेसिबलची मर्यादा
मोर्चावेळी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आवाजाची मर्यादा सर्वांनी पाळावी, अशी अट घालून पोलिसांनी परवानगी दिली आहे. यात औद्योगिक क्षेत्रात ७५ डेसिबल, व्यापारी क्षेत्रात ६५ डेसिबल, निवासी क्षेत्रात ५५ डेसिबल आणि शांतता झोनमध्ये ५० डेसिबलच्या मर्यादेत ध्वनिक्षेपक वापरावा. डीजे सिस्टिमचा वापर करू नये, अशीही अट पोलिसांनी घातली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.